Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
तुजारपूर येथे दरोडा : पावणे चार लाखांचा मुद्देमाल लंपास

01-Apr-2019 : इस्लामपूर प प्रतिनिधी

तुजारपूर (ता.वाळवा) येथील भास्कर तातोबा यादव यांच्या घरात घुसून भास्कर यादव यांच्या छातीवर रॉडने मारून जखमी करून व घरातील लोकांना चाकूचा धाक दाखवून पाच दरोडेखोरांनी १६ तोळे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ३ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल घेवून पलायन केले. रविवारी मध्यरात्री हा दरोडा पडला. या घटनेची नोंद इस्लामपूर पोलिसात झाली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तुजारपूर येथे भास्कर तातोबा यादव हे कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. ३१ मार्च रोजी रात्री १० च्या सुमारास घरातील सर्वजण जेवण करून झोपले होते. त्यांच्या सुना घराजवळील एका खोलीमध्ये झोपल्या होत्या. रात्री १२ च्या सुमारास आवाज आल्याने भास्कर यादव यांना जाग आली. घराचा दरवाजा उघडा दिसल्याने त्यांनी लाईट चालू केली.

त्यावेळी पाच इसम हातामध्ये चाकू व लोखंडी रॉड घेवून घरात शिरलेे. भास्कर यादव यांनी तुम्ही कोण, काय पाहिजे अशी विचारणा केली असता एकाने गप्प खाली बस असे म्हणत त्यांच्या छातीवर रॉड मारला. या प्रकाराने घरातील महिला जाग्या होवून आरडाओरडा करू लागल्या. कुटुंबियांना चाकूची भिती दाखवून गप्प बसण्याची धमकी दरोडेखोरांनी दिली. त्यानंतर महिलांच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या, मंगळसुत्र, चांदीच्या पट्ट्या, कानातील रिंगा जबरदस्तीने काढून घेतल्या. एकाने कपाटाची चावी मागितली. चावी नाही म्हटल्यावर त्याने लोखंडी कपाट कटावणीने उचकटले. कपाटातील सोन्याचे दागिने काढून घेवून पाचजणांनी यादव यांच्या कुटुंबियांना घरामध्ये कोंडून बाहेरून कडी लावली.

दरम्यान घराशेजारी असणार्‍या खोलीमधून यादव यांच्या सुनांच्या ओरडण्याचा आवाज आला. यादव यांच्या घराच्या दरवाजावर चोरटे मोठ-मोठे दगड मारत असल्याने घरामध्ये त्या गप्प बसल्या होत्या. दहा मिनिटांनी यादव यांची सुन पल्लवी हिने घराच्या दरवाजाची बाहेरून कडी काढली, तेव्हा सुना वास्तव्यास असणार्‍या खोलीतही घुसून दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून सोन्याचे व चांदीचे दागिने जबरीने नेल्याचा खुलासा झाला.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter