Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
शेट्टींना दुर्बुध्दी सुचली, आता परिणाम भोगा ः ना.चंद्रकांतदादा

01-Apr-2019 : शेट्टींना दुर्बुध्दी सुचली, आता परिणाम भोगा ः ना.चंद्रकांतदादा

इस्लामपूर प प्रतिनिधी

ज्यांनी शेतकर्‍यांवर गोळ्या व लाठ्या चालविल्या त्यांच्या मांडीला मांडी लावून खा.राजू शेट्टी बसले आहेत. खा.शेट्टींना दुर्बुध्दी सुचल्याने त्यांनी वारंवार बाजू बदलली. त्याचा परिणाम त्यांना नक्कीच भोगावा लागणार असल्याचा इशारा महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला. हातकणंगले, शिरोळ, इचलकरंजी, शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवसेनेची ताकद आहे. वाळवा व शिराळा तालुक्यातील विकास आघाडीने भाजप-शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या मागे राहण्याचा निर्णय घेतल्याने चिंता मिटल्याचे त्यांनी सांगितले. जिथे जिथे मला यावे लागेल तेथे मी नक्की येईन असे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले.

पेठ नाका (ता.वाळवा) येथे महाडिक कॉलेज कार्यस्थळावर विकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. ना.सदाभाऊ खोत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. वनश्री नानासाहेब महाडिक, सी.बी.पाटील, राहुल महाडिक, सम्राट महाडिक, आनंदराव पवार, विक्रम पाटील, दि.बा.पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. ना.चंद्रकांतदादा पाटील पुढे म्हणाले, शेतकरी हिताचे निर्णय घेणार्‍या मोदींचे तुम्ही भक्त झाला असता तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात एकतर्फी निवडणूक झाली असती. मी केलेली टीका खा.शेट्टींना झोंबली. मी बिंदू चौकात समोरासमोर येण्यास कधीच घाबरत नाही. राज्य सरकारने एफआरपी वाढविली, दूधाला अनुदान, साखरेचा दर जाहीर केला त्यामुळे खा.राजू शेट्टी बेरोजगार झाले. वाळवा-शिराळ्यातील मताधिक्यावर धैर्यशील माने विजयी होतील यात शंका नाही.

ना.सदाभाऊ खोत म्हणाले, शिराळा व वाळव्यातील विरोधी विकास आघाडीला ३० ते ३५ वर्षांपासून एकत्रित ठेवण्याचे काम नानासाहेब महाडिक यांनी केले आहे. कोणत्याही निवडणुकीत सर्वपक्षीय विकास आघाडी एकत्रित बसून निर्णय घेते. आघाडीत मागे-पुढे झाले तरी कोणत्याही निवडणुकीसाठी एका मनाने आम्ही सामोरे जातो. वाळवा व शिराळा तालुक्यांतून विकास आघाडीच्या जोरावर धैर्यशील माने यांना प्रचंड मताधिक्य देणार आहोत.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter