Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
‘लुच्चे दिन’ दाखविणार्‍या हिटलरशाहीला संपवा

02-Apr-2019 : सांगली / प्रतिनिधी

लोकसभेच्या निवडणुकीत ‘अच्छे दिन ’ येतील म्हणून भाजपच्या कळपात शिरलो ही घोडचूक झाली , मात्र अच्छे दिन आले नाहीत तर ‘लुच्चे दिन’ आले आहेत. मात्र आम्ही हाडाचे शेतकरी आहोत, जसे कमळ फुलविता येते तसे तणनाशक देखील मारायला येते. त्यामुळे या निवडणुकीत हिटलरशाही भाजपचा पाडाव करण्यासाठी उठाव करा, असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते खा.राजू शेट्टी यांनी मंगळवारी प्रचार शुभारंभावेळी सांगलीत केले.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी-स्वाभिमानी शेतकरी संघटना महाआघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार शुभारंभ येथील स्टेशन चौकातील वसंतदादा स्मारकासमोर झाला. यावेळी आयोजित सभेत खा.राजू शेट्टी बोलत होते. सभेला आ.जयंत पाटील, आ. विश्‍वजीत कदम, आ.सुमनताई पाटील, माजी आ. सदाशिव पाटील, उमेदवार विशाल पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील, कोल्हापूर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे , माजी आ. पी.एन.पाटील, सत्यजीत देशमुख, जयश्रीताई पाटील, शैलजाभाभी पाटील, संजय बजाज, कमलाकर पाटील, दिलीपतात्या पाटील, अविनाशकाका पाटील आदी उपस्थित होते.

खा. राजू शेट्टी म्हणाले, गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या कळपात शिरलो होतो ही घोडचूक झाली. शेतकर्‍यांसाठी थापाड्या भाजपबरोबर गेलो. शेती मालाला हमीभाव मिळाला नाही. अच्छे दिनच्या नावाखाली ‘लुच्चे दिन’ बघायला मिळाले. मात्र आता झालेली चूक दुरूस्त करायची आहे. शेतकर्‍यांना संपवायला निघालेल्या अवलादीला आता संपवले पाहिजे. प्रत्येकाला बघून घेण्याची धमकी दिली जात आहे. धमक्या देणारी अवलाद काय सद्दाम हुसेनची आहे काय? असा सवाल शेट्टी यांनी केला. आमच्या अंगावर अनेक गुन्हे दाखल झाले , मात्र जुन्या सत्ताधार्‍यांनी कधी वैयक्तिक स्वार्थ साधला नाही.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्याचा आरोप आमच्यावर होत आहे. मात्र यांच्याबरोबर मांडीला मांडी लावणे आम्हा शेतकर्‍यांना परवडते मात्र जे शेतकर्‍यांना संपविण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यांची संगत नको. भविष्यात देखील शेतकर्‍यांसाठी लढणार आहे. ही वैचारिक लढाई आहे. संघर्ष आमच्या पाचवीला पुजलेला आहे. मात्र आता लोकशाही जिवंत रहावी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना कायम राहावी, यासाठी आमचा लढा आहे. या कोल्ह्या, कुत्र्यांच्या हातात देश जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही , असा इशारा खा.शेट्टी यांनी दिला. भाजपकडून विकासाची खूप भाषणबाजी झाली. मात्र प्रत्यक्षात निधी आला नाही. एकमेकांची डोकी फोडून अविश्‍वास निर्माण करण्याचे काम झाले. गोड भाषणे करून एकदा मते घेता येतात , मात्र दुसर्‍यावेळी मते मागण्यासाठी विश्‍वास संपादन करावा लागतो.

शेतकर्‍यांसाठी भूमी अधिग्रहण कायदा आहे. मात्र त्यात बदल करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. उद्योगपतींच्या घश्यात शेतकर्‍यांच्या जमिनी घालण्याचा त्यांचा उद्योग होता , मात्र आम्ही हा प्रयत्न हाणून पाडला असल्याचे खा.शेट्टी यांनी सांगितले.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter