Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
भ्रष्ट संजयकाकांचे डिपॉझीट घालवू...

03-Apr-2019 : सांगली / प्रतिनिधी

जिल्ह्यातील आमदारांना मंत्री होण्यापासून रोखणारे, नागेवाडी कारखाना किरकोळ किंमतीत घशात घालून तासगावचा घास घेऊ पाहणारे तर अधिकार्‍यांच्या बदल्या व कंत्राटांमधून पैसा मिळविणारे भ्रष्ट खासदार संजयकाकांचे डिपॉझीट यावेळी घालवू, अशी घणाघाती टीका बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी प्रचार शुभारंभाप्रसंगी केली. संजयकाकांना जर परराष्ट्रमंत्री केले असते तर त्यांनी देश विकला असता, अशी टीका करत त्यांनी वसंतदादांच्या संस्था मोडीत काढल्याबद्दल विशाल पाटलांनाही जोरदार लक्ष्य केले. प्रचंड शक्तिप्रदर्शनासह गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ येथील स्टेशन चौकातील वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाला. यावेळी प्रचार शुभारंभ सभेत गोपीचंद पडळकर बोलत होते. यावेळी माजी आमदार प्रकाश शेंडगे, जयसिंगतात्या शेंडगे, उत्तम जानकर, समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, शकील पिरजादे, विद्या तामखडे, नानासाहेब वाघमारे यांच्यासह धनगर, मुस्लिम, दलित समाजाचे नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, निवडणूक लढणार नाही म्हणून अनेकांनी अपप्रचार केला, मात्र आता मैदानात उभा आहे. गर्दी जमविण्यासाठी कोणाला पैसे दिले नाहीत. प्रस्थापित व्यवस्थेने पिढ्या न पिढ्या अपमान केला. मते घेतली आणि नांगर फिरवला. त्यांना चपराक देण्यासाठी ही निवडणूक आहे. त्यामुळे आज गर्दी आहे. प्रस्थापितांना मते मागताना गोपीचंद पडळकर चाललो मात्र तो उभारला की तो का चालत नाही? असा सवाल त्यांनी केला.

पुढार्‍यांच्या पाठीमागे आता कोणी नाही. मराठा, धनगर, बौध्द, मुस्लिम समाजासह १२ बलुतेदारांची ही निवडणूक आहे. ‘जिसकी जितनी भागीदारी उसको इतनी हिस्सेदारी’ ही गरज आहे. प्रत्येक मुस्लिम अतिरेकी नसतो. जात-पात धर्म भेदभाव नको आहे. माझ्याकडे सन्मान व स्वाभिमान आहे. विविध जातींचे अनेक प्रश्‍न आहेत. मात्र हे प्रश्‍न सोडविले जात नाहीत. सरकार एका बैठकीत प्रश्‍न सोडवू शकते. मात्र सरकार प्रश्‍न सोडवत नाही.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter