Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
सांगलीत प्रमुख उमेदवारांचे अर्ज वैध

05-Apr-2019 : सांगली / प्रतिनिधी

सांगली लोकसभा निवड णुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी शुक्रवारी झाली. प्राप्त अर्जापैकी आ. सुधीर गाडगीळ यांचा एकमेव अर्ज अवैध ठरला. वीस उमेदवारांचे २६ अर्ज वैध ठरले आहेत. उमेदवारी अर्ज माघारीचा सोमवार अंतिम दिवस आहे. त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे, त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणातून कोण-कोण माघार घेणार याकडे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी २८ मार्चपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गुरुवार (दि. ४) अर्ज भरण्याचा अंतिम दिवस होता. शुक्रवारी छाननी तर आठ एप्रिल हा माघारीचा अंतिम दिवस आहे. यानंतर दि २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी मुदतीमध्ये २१ जणांचे अर्ज दाखल झाले होते. या अर्जावर शुक्रवारी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या उपस्थितीत छाननी झाली. या छाननीमध्ये भाजपाकडून डमी असलेला आ. सुधीर गाडगीळ यांचा एकमेव अर्ज अवैध ठरला , तर २० उमेदवारांचे २६ अर्ज वैध ठरले. अर्ज अवैध ठरु नये यासाठी उमेदवारांनी वकीलांची यंत्रणा तयार ठेवली होती , मात्र अर्जावर विरोधी उमेदवारांकडून हरकत घेण्यात आली नसल्याने अर्ज वैध ठरले.

प्रमुख उमेदवारांसह दाखल बहुतांशी अर्ज वैध ठरल्याने आता माघारीकडे लक्ष लागले आहे. सोमवार (दि. ८) रोजी माघारीचा अंतिम दिवस असून त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. अर्ज वैध ठरलेल्यांमध्ये भाजपा-शिवसेना युतीचे संजयकाका पाटील, कॉंग्रेस - राष्ट्रवादी आघाडी कडून विशाल पाटील, बहुजन वंचित आघाडीकडून गोपीचंद पडळकर यांच्यासह अधिक बन्ने, अपक्ष अशोक माने, अभिजित बिचुकले, नानासो बंडगर, शंकर माने, भक्तराज ठिगळे, ऋषिकेश साळुंखे, महाराष्ट्र क्रांती सेना, राजेंद्र कवठेकर, बहुजन मुक्ती, सचिन वाघमारे, अपक्ष, अंकुश घुले, अपक्ष, राजेंद्रप्रसाद जगदाळे, स्वाभिमानी, अजितराव पाटील, बहुजन मुक्ती पार्टी, दत्तात्रय पाटील, बहुजन वंचित पार्टी, नारायण मुळीक, अपक्ष, आनंदा नलगे , बळीराजा पार्टी, अल्लाउद्दिन काझी यांचे अर्ज वैध ठरले आहेत.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter