Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
छ.संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त पदयात्रा

05-Apr-2019 : सांगली / प्रतिनिधी

छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मासानिमित्त शहरातील प्रमुख मार्गावरून मूकपदयात्रा काढण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरून ही मूकपदयात्रा काढण्यात आली.

वढूबुद्रुक येथून शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी ज्योत आणली होती. ती मारुती मंदिरात ठेवण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी मूकपदयात्रेस प्रारंभ झाला. आनंदराव चव्हाण यांच्या हस्ते ज्वालेचे पूजन करण्यात आले. राजू शहापूरे यांनी ध्येयमंत्र म्हटला. मिलिंद तानवडे यांनी ‘नक्षे परसे नाम मीटा दो’ हे गीत म्हटले. संभाजी सुर्यहृदय हा श्‍लोक सामुदायिकरीत्या म्हणण्यात आला. मारुती रोडवरून मूकपदयात्रेला प्रारंभ झाला. कापड पेठ, राजवाडा चौक, स्टेशन चौक, बदाम चौक, पंचमुखी मारुती रोड,फौजदार गल्ली,बापट बाल रोड, गावभाग या मार्गावरून निघालेल्या मूकपदयात्रेची मारुती चौकात सांगता झाली. या ठिकाणी संभाजी महाराजांच्या प्रतीकात्मक चितेला भडाग्नी देण्यात आला. बलिदान मासानिमित्त अनेकांनी उपास, गोड न खाणे, चप्पल न घालणे , गादीवर न झोपता जमिनीवर झोपणे, मुंडण करणे, चहा न पिणे असे संकल्प केले होते.

बलिदानमासाचे हे ३३० वे वर्ष आहे. मूकपदयात्रेत माजी आ. नितीन शिंदे, नितीन चौगुले, अविनाश सावंत, बापू हरिदास, अंकुश जाधव, सुनील बेळगावे, मोहनसिंग रजपूत, प्रशांत गायकवाड, संजय तांदळे, सचिन पवार, अमित करमुसे यांच्यासह अन्य मान्यवर व शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter