Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
पदयात्रा, थेट संपर्कावर भर

05-Apr-2019 : सांगली / प्रतिनिधी

सांगली लोकसभा मतदारसंघात चुरशीची तिरंगी लढत निश्‍चित झाली आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात खा. संजयकाका पाटील, विशाल पाटील व गोपीचंद पडळकर यांनी प्रचार शुभारंभानंतर व्यक्तीगत भेटीगाठी, पदयात्रा व थेट संपर्कावर भर दिला आहे. गुढी पाडव्यानंतर निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यात राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत. भाजपकडून संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, कॉंग्रेस आघाडीकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर किंवा खा. असदुद्दीन ओवेसी यांच्या सभा होणार असल्याचे वृत्त आहे.

जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीचा ज्वर वाढू लागला आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर प्रमुख उमेदवारांसह स्थानिक कार्यकर्त्यांकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. भाजप-सेना युतीचे उमेदवार संजयकाका पाटील, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील तसेच वहुजन वंचित आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात केली आहे. पदयात्रा, गाठीभेटीवर सध्या भर दिला जात आहे. निवडणुकीच्या रिंगणात प्रमुख पक्षांशिवाय अन्य अपक्ष उमेदवार असले तरी खरी लढत तिघांमध्ये होणार असल्याचे स्पष्ट आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात आल्या होत्या. यापुढील काळात फैरी आणखी तीव्र होण्यास सुरुवात होईल. त्यामध्ये राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांचा समावेश होणार आहे. दिग्गज नेत्यांच्या सभा मतदारसंघात होण्यासाठी पक्षांकडून नियोजन करण्यात येत आहे. भाजपकडून संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सभा होणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची सभा घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या प्रचार सभा होणार आहेत. त्याचे नियोजन सध्या सुरू झाले आहे , तसेच कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या सभेसाठी कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी प्रदेश पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर समविचारी ५६ पक्ष व संघटनांनी भाजपविरोधात महाआघाडी केली आहे. महाआघाडीत शेतकरी संघटनेला हातकणंगले व सांगली लोकसभेची जागा सोडण्यात आली आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter