Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
ऐन आचारसंहितेत खोकी पुनर्वसनाचा घाट : न्यायालयात जाण्याचा इशारा

07-Apr-2019 : सांगली /प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना महापालिकेने स्टेशन चौकात वसंतदादा स्मारकाच्या पश्‍चिमेला ३० खोकी बसविली जाणार आहेत. या कामाला विरोध झाल्याने तीन वर्षापासून ही फाईल उघडली नव्हती. पण आता महापालिकेत भाजपची सत्ता आली आणि आचारसंहितेचा फायदा उठविता पुन्हा खोक्याच्या पुनर्वसनाची फाईल उघडण्यात आली आहे. या विरोधात माजी उपमहापौर प्रशांत पाटील मजलेकर यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

दहा वर्षापूर्वी महापालिका क्षेत्रात रस्त्यावरील खोकी हटविण्यात आली. या खोक्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न भिजतच पडला होता. विशेषत: स्टेशन चौक ते आझाद चौकापर्यंत रस्त्याच्या एका बाजूला खोक्यांची भली मोठी रांग होती. त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा होत होता. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या सांगली दौर्‍याचे निमित्त करून खोकी काढण्यात आली. त्यानंतर स्टेशन चौकातील खोक्यांच्या पुनवर्सनासाठी महापालिकेने व्यापारी संकुलही उभारले. दोन टप्प्यात झालेल्या संकुलात ४२० खोक्यांचे पुनवसर्र्न करण्यात आले. अजूनही खोक्याचे पुनर्वसन झाले नसल्याचे महापालिकेच्या दप्तरी नोंद आहे.

यापैकीच २७ खोक्याचे पुनवर्सन करण्याचा घाट घातला आहे. त्यासाठी वसंतदादा स्मारकाच्या मागील बाजूला असलेल्या रस्त्यावर खोकी उभारण्याचे काम सुरू झाले आहे. वास्तविक निवडणुक आचारसंहिता असताना खोकी उभारता येतात का? असा सवाल आता केला जात आहे. तीन ते चार वर्षांपूर्वी हा प्रस्ताव महापालिकेत चर्चेला आला होता. तेव्हा तत्कालीन नगरसेवक प्रशांत पाटील - मजलेकर यांनी त्याला विरोध केला होता. त्यामुळे प्रशासनानेही खोकी पुनवर्सनाची फाईल बासनात ठेवली होती. आता न्यायालयीन निकालाचा आधार घेत ऐन आचारसंहितेत पुनर्वसनाचे काम हाती घेतले आहे. याबाबत मजलेकर सोमवारी आयुक्त रविंद्र खेबूडकर यांना भेटून निवेदनही देणार आहेत. प्रशासनाने पुनर्वसन थांबविले नाही तर न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter