Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
आरोपीस पळून जाण्यास मदत करणार्‍या तिघांना अटक

07-Apr-2019 : कवठेमहांकाळ / प्रतिनिधी

कवठेमहांकाळ पोलिसांनी अटक केलेला आरोपी वैद्यकिय तपासणीनंतर हिसडा देवून पळून गेला. या प्रकरणी आरोपीस मदत करणार्‍या चौघांविरुद्ध कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौघां आरोपींपैकी कवठेमहांकाळ पोलिसांनी तीन आरोपीना अटक केली असून मुख्य आरोपीसह दोघे फरारी आहेत.

आरोपीस पळून जाण्यास मदत करणार्‍यांची नांवे पोलिस तपासात निष्पन्न झाली आहेत. पोलिसांनी विशाल बसाप्पा कोलार (वय २१ रा. बेघर वसाहत, सरकारी दवाखान्याजवळ, कवठेमहांकाळ,) सिध्दार्थ अनिल वाघमारे (वय २२), प्रज्वल अनिल माने (वय १९, दोघेही रा.आंबेडकर नगर, कवठेमहांकाळ) या तीन आरोपीना शनिवारी रात्री अटक केली आहे , तर तेजस शामराव माने (रा. आंबेडकर नगर, कवठेमहांकाळ) हा पोलीसांना अद्याप मिळू शकला नाही. तसेच मुख्य आरोपी संतोष आटपाडकर फरारी असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीसांकडून समजलेली माहिती अशी की, कवठेमहांकाळ येथील व्यापार्‍याच्या गाडी चोरी प्रकरणी पोलिसांनी शुक्रवार दि. ५ एप्रिल रोजी पोलीसांनी अमर उर्फ संतोष जयराम आटपाडकर (वय २६, रा.पिंपळवाडी ) यास अटक केली होती.अटक केल्यानंतर सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास उप जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून परत येत असता अंधाराचा फायदा घेवून आरोपी हिसडा मारून पळून गेला . मुख्य आरोपीस पळून जाण्यास मदत करणार्‍या चौघांपैकी तीघांना अटक केली असून इतर दोन फरारी आरोपींचा शोध चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले. कवठेमहांकाळचे पोलिस निरीक्षक आप्पासाहेब कोळी अधिक तपास करीत आहेत.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter