Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
संजय पाटलांची मस्ती जनताच जिरवेल : विशाल पाटील

07-Apr-2019 : तासगाव / प्रतिनिधी

गुंडगिरी करून जनतेला भिती दाखवणार्‍या संजय पाटलांच्या पापाचा घडा आता भरला आहे. आमदार सुमनताई पाटील यांना कोंडून हल्ला करणार्‍या संजय पाटलांची मस्ती तासगावची जनता या निवडणुकीत उतरवेल. कारण मी आता जनतेबरोबर आहे , असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांनी केले.

तासगाव तालुका प्रचार दौर्‍याचा शुभारंभ ढवळी येथे रविवारी सकाळी करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सुमनताई पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अविनाशकाका पाटील , सुरेशभाऊ पाटील, ताजुद्दीन तांबोळी, विश्‍वास पाटील, विजयअण्णा पाटील, अमोल पाटील, डी . के. पाटील, पतंगबापू माने, स्वप्निल जाधव, भिमराव खरमाटे, अमोल शिंदे, प्रा. एस. के. पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

विशाल पाटील पुढे म्हणाले, आबा नाहीत म्हणून संजय पाटलांच्या अंगात मस्ती चढली आहे. आपण काहीही करु शकतो अशी त्यांची वेडी मानसिकता झाली आहे. त्यामुळे ते कुणालाही दाबण्याचा प्रयत्न करत आहेत , पण त्यांच्या पापाचा घडा आता भरला आहे. लोकसभा निवडणूक ही संधी आहे. आबा आणि वसंतदादांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांच्याबरोबर तासगाव तालुक्यातूनही मताधिक्य मिळेल, असा विश्‍वास विशाल पाटील यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, खासदार पाटील यांनी घरातील व्यक्तिंना चांगली वागणूक देता येत नाही. त्यांच्याकडून लोकांनी काय अपेक्षा ठेवायची ? गेली साडेचार वर्षे जो अन्याय सहन केला तो परत सहन करायचा नाही. तासगाव तालुक्यात खासदार पाटील यांची गुंडशाही वाढली आहे. त्यांनी आमदार सुमनताई पाटील यांना कोंडून मारण्याचा प्रयत्न केला. तासगाव भोवतीच्या जमिनी दंडूकेशाहीने रेटून स्वत:च्या नावावर करुन घेतल्या आहेत. दोन कारखाने घेतले. उद्या आपल्या गावात येऊन तुमचे घर नावावर करुन घेतले तरी तुम्ही काही करु शकणार नाही. मी वसंतदादा आणि आर. आर. आबांच्या विचारांचा वारसदार आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter