Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
सोशल मिडियातील प्रचारामुळे तणाव

07-Apr-2019 : सांगली / प्रतिनिधी

सांगली लोकसभेची निवडणूक प्रथमच विकासकामांच्या मुद्द्यावर न गाजता जाती-धर्म व वैयक्तिक टीका-टिप्पणीवरून गाजू लागली आहेत. फेसबुक, व्हॉट्सऍपच्या माध्यमातून अनेक नेत्यांच्या अश्‍लिल शिवीगाळ, वैयक्तिक आरोपांच्या क्लिपा व्हायरल होऊ लागल्या आहेत. त्यामुळे जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे पोलीस दलाने तातडीने या प्रकारात लक्ष घालून सोशल मिडियावर आळा घालावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

सांगली लोकसभेसाठी २३ एप्रिलला मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी भाजपकडून विद्यमान खासदार संजयकाका पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील तर बहुजन वंचित आघाडीकडून गोपीचंद पडळकर निवडणूक रिंगणात आहेत. निवडणूक प्रचाराला सुरुवात झालेली आहे. मात्र देश, राज्य व जिल्हा पातळीवर विकासकामांची चर्चा होताना कुठेही दिसत नसल्याचे चित्र आहे. जाती-धर्माची राजकीय गणिते व वैयक्तिक पातळीवर टीकाच सुरू झाली आहे. लोकसभेची निवडणूक म्हणजे देशाचे भवितव्य ठरविण्याची निवडणूक असते. या निवडणुकीतून खासदार निवडून द्यायचा असतो. जेणेकरून आपल्या देशाचे भवितव्य घडविण्यासाठी त्यांच्याकडून दिल्ली पातळीवर प्रयत्न झाले पाहिजेत. शिवाय मतदारसंघात नवीन उद्योगधंदे, मोठे प्रकल्प आणून रोजगाराची संधी निर्माण करणे, अशी महत्वाची कामे खासदारांची असतात. शिवाय गेल्या पंचवार्षिकमध्ये निवडून दिलेल्या खासदारांच्या कामगिरीवर चर्चा करणारी निवडणूक असते , मात्र या निवडणुकीत चित्र वेगळेच दिसत आहे.

लोकसभेची निवडणूक पूर्वी कॉंग्रेस विरूध्द भाजप अशी होत होती. कॉंग्रेसकडे मुस्लिम, दलित, मराठा, लिंगायत समाजाची व्होट बँक असायची , तर भाजपकडे ब्राह्मण, गुजराथी, व्यापारी, धनगर, जैन समाजातील जास्तीत जास्त व्होट बँक असायची , मात्र यावेळी चित्र बदलले आहे. यावेळी प्रथमच प्रकाश आंबेडकर व एमआयएमचे खासदार ओवेसी यांनी बहुजन वंचित आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीच्या माध्यमातून राज्यात उमेदवार देखील उभे केले आहेत. सांगलीत देखील गोपीचंद पडळकर मैदानात आहेत , ते धनगर समाजाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी धनगर समाजावर लक्ष केंद्रित केले आहेत. तर प्रकाश आंबेडकर यांना मानणारा दलित तर ओवेसी यांना मानणारा मुस्लिम समाज खेचण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. तशा जातीयवादी पोस्ट शेअर होताना दिसत आहेत. त्यामध्ये दुसर्‍या समाजाचे महत्व कमी करण्याचा उद्देश या माध्यमातून दिसत आहे.

खा. संजयकाका पाटील यांनी गेल्या पाच वर्षांत कोणती कामे केली ? जिल्ह्याचा विकास झाला का? यावर चर्चा झालेली दिसत नाही. वैयक्तिक टिका-टिप्पणी सुरू आहे. गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांना संजयकाका पाटील टार्गेट करू लागले आहेत. सोशल मिडियावर देखील तशा पोस्ट येत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना यावेळी लोकसभेच्या मैदानात आहे. कॉंग्रेसचे चिन्ह प्रथमच या निवडणुकीत नसणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा.राजू शेट्टी यांनी ‘सैन्यात आपली पोरं जातात. देशपांडे, कुलकर्णी सैन्यात जात नाहीत’ असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे ब्राह्मण समाजात नाराजी पसरली . त्यांनी नुकताच माफीनामा दिला असता तरी त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई केल्याचे वृत्त आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter