Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
जतमध्ये बोगस चलनांद्वारे शासनाची २६ लाखांची फसवणूक

10-Apr-2019 : जत / प्रतिनिधी

बोगस चलनावर स्टेट बँकेचा खोटा शिक्का मारून शासनाची १४ लाख ४८ हजार ८२५ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी जत पोलिसात पाच जणांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर उमदी पोलिस ठाण्यात याचप्रकरणी तिघा वाहनधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांवर ११ लाख ४२ हजार २२५ रूपयांची शासनाची फसवणूक करून अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

राजकुमार रावसाहेब सावंत (निगडी खुर्द), शफिक बाबुमिया शेख (जत), ज्ञानेश चंदर पांढरे, संतोष शंकर पाथरूट (जत) व दादासाहेब नामदेव हिप्परकर अशा पाच जणांविरोधात जत पोलिस ठाण्यात तर किरण ज्योत्याप्पा बेळुंखी, संतोष शंकर पाथरूट, अरूण शंकर बिराजदार या तिघांविरोधात उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की , जत तालुक्यात अवैध वाळू तस्करीप्रकरणी पाच वाहनांवर कारवाई करण्यात आली होती. दि. १५ जानेवारी ते १३ मार्च दरम्यान वरील संशयित आरोपींनी शासकीय चलनावर स्टेट बँकचा बोगस शिक्का उमटवून शासनाची सुमारे २६ लाख रूपयांची फसवणूक केली आहे , तसेच पैसे शासनाच्या खात्यात भरल्याचा फार्स करून बोगस कागदपत्रांच्या आधारे जत तहसिलकडील कारवाईतील वाहने सोडवून नेली आहेत. शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपावरून पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जतचा तपास सपानिअनिल माने तर उमदी ठाण्याचा तपास कोळेकर करत आहेत.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter