Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
पाणी अडवून राजकारण करणार्‍यांना धडा शिकवा

10-Apr-2019 : -विशाल पाटील

जत / प्रतिनिधी

भाजप निवडून आले तरच पाणी देतो, असे म्हणून जत तालुक्यात पाण्याचे राजकारण सुरू आहे. राजकारणासाठी पाणी अडविण्याचे पाप ज्यांनी केले आहे , त्यांना आता धडा शिकवावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांनी केले.

लोकसभा निवडणुकीत प्रचारा साठी डफळापूर येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. जत तालुक्यातील दुसर्‍या दिवशीच्या दौर्‍याचा प्रारंभ धावडवाडी येथून केला. त्यांनी हिवरे, अंकले, बाज, बेळंखी, डफळापूर, कुडणूर, शिंगणापूर, मिरवाड, जिरग्याळ, एकुंडी, वज्रवाड, गुगवाड, बसर्गी, सिंदूर, उमराणी, खोजानवाडी, बिळूर, येळदरी या गावांचा दौरा केला. यावेळी सुरेश शिंदे, विक्रमदादा सावंत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अविनाशकाका पाटील, शेतकरी संघटनेचे प्रदीप पाटील, आप्पाराया बिराजदार, चंदूलाल शेख, महादेव पाटील, जी.के.माळी, शंकरराव गायकवाड, बी.आर. पाटील, भारत गायकवाड, हुसेन आत्तार, अजित भोसले, अब्दुल मकानदार, पोपट शिंदे, भानुदास गडदे, मनोहर भोसले, अजितराव गायकवाड, अशफाक शेख, दिलावर शेख यांच्यासह कार्यकर्ते प्रचार दौर्‍यात सहभागी झाले.

विशाल पाटील पुढे म्हणाले, प्रतिकदादांनी डफळापूरच्या बोकडतोंडी तलावात पाणी आणले होते. वसंतदादांनी म्हैसाळ प्रकल्प उभा केला. ते असते तर वीस वर्षांपूर्वीच जतला पाणी मिळाले असते. प्रतिकदादांनी एक हजार कोटींचा निधी आणला. दादा कधीही उद्घाटन करायला गेले नाहीत , पण यांनी मात्र फक्त ७४ कोटी आणले आणि ७४ कोटी नारळ फोडले. जर भाजपमध्ये येणार असाल तरच पाणी सोडतो , असं पाण्याचे राजकारण त्यांनी केले. या पापाची शिक्षा जनता त्यांना दिल्याशिवाय सोडणार नाही. पाणी आणणे हे आमचे कर्तव्य आहे. पूर्ण जत तालुक्याला पाणी मिळाल्या शिवाय मी स्वस्थ बसणार नसल्याचे पाटील यांनी सांगितले.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter