Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
उध्दव ठाकरेंची तोफ आज धडाडणार

10-Apr-2019 : सांगली / प्रतिनिधी

जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचा ज्वर वाढू लागला असून प्रचाराला गती आली आहे. या पार्श्‍वभूमीवर इस्लामपुरात आज (गुरुवारी) हातकणंगले मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार धैर्यशिल माने यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. ठाकरे प्रचारसभेत काय बोलणार याकडे सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ सांगलीत केंद्रियमंत्री सुरेश प्रभू यांची तर स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ तासगावमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे. जिल्ह्यात दिग्गज नेते येत असल्याने राजकीय वातावरण गरम होऊ लागले आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी आज गुरुवारी (दि. ११ एप्रिल) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विजय संकल्प सभा आयोजित केली आहे. सभेला पन्नास हजार लोक उपस्थित राहतील, असा अंदाज आहे.

ताकारी रस्त्यावरील नगरपालिकेच्या खुल्या नाट्यगृहात विजय संकल्प सभा गुरूवारी सायंकाळी चार वाजता होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख इस्लामपूर येथील सभेत कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडतील.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांची शुक्रवार दि. १२ रोजी तासगावात सभा होणार आहे , तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तासगाव येथे सभा घेण्यासाठी आमदार सुमनताई पाटील आग्रही आहेत. त्यांनी ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चादेखील केली आहे.

कॉंग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना महाआघाडीकडून विशाल पाटील निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी जिल्ह्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नेते सहभागी झाले आहेत. विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या सभा घ्याव्यात , यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार तासगावात सभा घेणार आहेत. तासगाव मार्केट कमिटीच्या सभागृहात शुक्रवार दि. १२ रोजी सकाळी अकरा वाजता सभा होणार आहे. या सभेचे नियोजन आ. सुमनताई पाटील करत आहेत. तसेच विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे या स्टार प्रचारकांच्या सभेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आ. सुमनताई पाटील यांनी राज ठाकरे यांच्याशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधला. तासगावात सभा घेण्याची विनंती आ.सुमनताई पाटील यांनी ठाकरे यांना केली आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार भाजप खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू शुक्रवारी सांगलीत येत आहेत. विश्रामबाग, सांगली परिसरातील नेमीनाथनगरमध्ये राजमती भवन येथे शुक्रवारी १२ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात सुरेश प्रभू नागरिकांशी हितगुज करणार आहेत. मेळाव्यासाठी वकील, डॉक्टर्स, इंजिनिअर्स, कॉंट्रॅक्टर्स, प्राध्यापक, शिक्षक, उद्योजक, व्यावसायिक, तज्ञ, लेखक, साहित्यिक, प्रशिक्षक , संस्थाचालक, खासगी क्षेत्रातील नोकरदार , अधिकारी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. सुरेश प्रभू हे उपस्थितांशी थेट संवाद साधून त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter