Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
भाजपविरोधात सुप्त लाट : सदाशिवराव पाटील

14-Apr-2019 : विटा / प्रतिनिधी

ग्रामीण व शहरी भागात मोदी सरकारविरोधात सुप्त लाट दिसत असून शेतकरी, यंत्रमागधारक, गलाई हे सर्व व्यवसाय अडचणीत आले आहेत. त्यामुळे आम्ही स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार विशाल पाटील यांच्यामागे उभे राहण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या विजयामध्ये खानापूर-आटपाडी तालुक्याचा सिंहाचा वाटा असेल, अशी भूमिका माजी आ.सदाशिवराव पाटील व माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी मांडली. गेले काही दिवस सदाशिवराव पाटील यांचा गट विद्यमान खा. संजयकाका पाटील यांच्याबरोबर राहणार की गोपीचंद पडळकरना मदत करणार? या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून ते कॉंग्रेसबरोबरच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

येथील भैरवनाथ मंगल कार्यालयात लोकसभा निवडणुकीतील भूमिका स्पष्ट करण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते रामरावदादा पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ऍड. बाबासाहेब मुळीक, कॉंग्रेेसचे तालुकाध्यक्ष रविआण्णा देशमुख, राजेंद्र माने, माजी नगराध्यक्ष ऍड. वैभव पाटील, माजी सभापती सुशांत देवकर , माजी समाजकल्याण सभापती किसन जानकर, पंचायत समिती सदस्य संजयकुमार मोहिते, सुरेश पाटील, धर्मेंद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी आ. ऍड. सदाशिवराव पाटील म्हणाले, महाआघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या विजयामध्ये खानापूर तालुक्याचा सिंहाचा वाटा असेल अशी आमची भूमिका असेल. गेल्या आठवडाभरात खानापूर मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधून चर्चा करून भावना जाणून घेतल्या.ग्रामीण आणि शहरी भागातसुध्दा मोदी सरकारविरोधात सुप्त अशी लाट दिसून येत आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter