Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
उमेदवारांकडून प्रचाराचा ‘सुपर संडे’

14-Apr-2019 : सांगली / प्रतिनिधी

सांगली लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्याकडे जात आहे. प्रचाराला अवघे सात दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे उमेदवारांनी पायाला भिंगरी बांधून प्रचारात उडी घेतली आहे. रविवारी प्रचाराचा सुपर संडे साधत भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी जोरदार प्रचार केला. भर उन्हात उमेदवारांनी दिवसभर प्रचार केला.

सांगली लोकसभेसाठी भाजपकडून विद्यमान खासदार संजयकाका पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील तर वंचित बहुजन आघाडीकडून धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर मैदानात आहेत. गेल्या बारा दिवसांपासून उमेदवारांनी लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा धडाका उडविला आहे. आरोप प्रत्यारोपांनाही उत आला आहे. मात्र अद्याप प्रचारात रंग चढलेला दिसत नाही. उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरू केल्याने प्रचार आता रंगात आला आहे. रविवार सुट्टीचा दिवस होता. या दिवशी अनेक मतदार घरीच असतात. त्यामुळे उमेदवार दिवसभर प्रचारात व्यस्त होते. कडक उन्हात उमेदवारांनी प्रचार केला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांनी आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी, कानकात्रेवाडी, तनपुरेवाडी, औटेवाडी, धावडवाडी, मिटकी, खरसुंडी, चिंचोळे, वलवण, घाणंद, जांभुळणी, कामथ, घरनिकी, पिंपरी, विभूतवाडी, झरे, निंबवडे, गळतेवाडी, आवळाई, पळसखेल, राजेवाडी, लिंगीवरे, पुजारवाडी, उंबरगाव, विठलापूर येथे प्रचार बैठका घेतल्या. तर दिघंची येथे प्रचार रॅली काढून जाहीर सभा घेण्यात आली. भाजपचे उमेदवार खा.संजयकाका पाटील यांनी प्रचाराचा सुपर संडे साधत शहरासह अनेक ठिकाणी मतदारांच्या गाठीभेठी घेतल्या.

बहुजन वंचित आघाडीचे उमदेवार, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी सांगली शहर परिसरात जोरदार प्रचार केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी अनेक मंडळांच्या कार्यक्रमांना हजेरी लावली होती. तरूणांनी त्यांचे जल्लोषी स्वागत केले. गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी शहरातून मोटरसायकल रॅली काढली. या रॅलीत अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यानंतर धामणी येथे प्रचार बैठका घेतल्या. सायंकाळी नेवरीला त्यांची जाहीर सभा झाली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

रविवारी सुट्टीचा दिवस साधून भर उन्हात स्वाभिमानी शेतकरी संघटना, भाजप व बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवारांनी जोरदार प्रचार केला.निवडणुकीसाठी उमेदवारांना रविवार दि. २१ पर्यंत प्रचार करता येणार आहे. त्यामुळे प्रचाराला आता अवघे सात दिवस शिल्लक राहिले आहेत. या सात दिवसात उमेदवारांनी केंद्रीय व राज्यपातळीवरील नेत्यांच्या सभा घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपकडून पक्षाचे अध्यक्ष खा.अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, स्वाभिमानीकडून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री छगन भुजबळ तर वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर व एमआयएमचे ओवेसी यांच्या सभा होण्याची शक्यता आहे. शेवटच्या टप्प्यात मोठ्या नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter