Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
नेतृत्वाची पोकळी विशाल भरुन काढणार?

25-Apr-2019 : सांगली / शरद पवळ

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढताना विशाल पाटील यांची ओळख आता जिल्हा नेतृत्वाच्या स्पर्धेत येत आहे. दिग्गज नेते पतंगराव कदम, मदन पाटील, आर.आर. पाटील, शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानंतर निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी विशाल पाटील भरुन काढणार काय? अशी चर्चा सध्या सुरु झाली असून त्यांच्या वक्तृत्व शैलीमुळे व कामाच्या पध्दतीमुळे लवकरच ते जिल्हा नेतृत्वाच्या स्पर्धेत येतील, अशी शक्यता आहे. आतापर्यंत महानगरपालिका, जिल्हा बँक, बाजार समिती, वसंतदादा कारखाना एवढ्यापुरते मर्यादित राहिलेले त्यांचे नेतृत्व लोकसभेच्या निमित्ताने जिल्हाव्यापी होऊ लागले आहे.

सांगली जिल्हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता , मात्र कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या अंतर्गत लढाईत भाजपची जिल्ह्यात ताकद वाढली. लोकसभा, चार विधानसभा, जिल्हा परिषद व महापालिकेसारख्या महत्वाच्या संस्था भाजपने ताब्यात घेतल्या , तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री आर.आर.पाटील, माजी मंत्री मदन पाटील, डॉ.पतंगराव कदम व विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख या दिग्गज नेत्यांचे निधन अलीकडच्या पाच वर्षाच्या काळात झाले. या नेत्यांच्या निधनामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये प्रचंड पोकळी निर्माण झाली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील व कॉंग्रेसचे युवा आमदार विश्‍वजीत कदम यांच्याकडे देखील जिल्ह्याचे नेतृत्व करतील, असे पाहिले जाते. मात्र ते राज्याच्या नेतृत्वाच्या यादीत आहेत. त्यामुळे जिल्हा नेतृत्वाची कॉंग्रेस-राष्ट्रवादीत वानवा आहे. प्रत्येकजण आपल्या मतदारसंघापुरते नेतृत्व करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेतृत्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी आता विशाल पाटील यांच्या रूपाने भरून निघणार, असा अंदाज अनेक जाणकार व्यक्त करत आहेत.

विशाल पाटील यांनी वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदापासून राजकारणाचा पाया रोवला , त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत ते उतरले. पहिल्यांदा अपयश आले, मात्र नंतर त्यांनी स्व. मदनभाऊ पाटील यांचा पराभव करत राजकारणात एन्ट्री मारली. त्यानंतर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक त्यांनी हाताळली. त्यानंतरच्या काळात स्व.मदनभाऊ पाटील यांचे निधन झाल्यानंतर त्यांनी महापालिकेत नगरसेवकांचा स्वतंत्र गट बांधला होता. त्यानंतर झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत देखील सक्रीय सहभाग घेत कॉंग्रेसचे अनेक नगरसेवक त्यांनी निवडून आणले.

लोकसभेसाठी विशाल पाटील कॉंग्रेस पक्षाकडून इच्छूक होते , मात्र कॉंग्रेसने ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली. त्यामुळे विशाल पाटील यांनी स्वाभिमानीच्या बॅनरखाली जोरदार निवडणूक लढविली. या काळात त्यांनी मतदारसंघात प्रचाराचा धडाका लावला होता. त्यांची अनेक प्रभावी भाषणे जोरदार गाजली. त्यांच्या वक्तृत्व शैलीमुळे त्यांची भाषणे सोशल मिडियावर जोरदार व्हायरल झाली. त्यांच्या भाषणाला तरूणांचादेखील चांगला प्रतिसाद मिळाला. सोशल मिडियावर त्यांचा फॅनक्लब मोठा आहे. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून त्यांनी जोरदार पेरणी केली.

सांगली शहराबरोबर मिरज, जत, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर, विटा, पलूस व कडेगाव तालुक्यात कार्यकर्त्यांचे जाळे विनले आहे. गेल्या पाच वर्षात विस्कटलेली कॉंग्रेस-राष्ट्रवादीची घडी घट्ट बसविली. विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत , त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक व सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होणार आहे. या निवडणुका कॉंग्रेस-राष्ट्रवादीसाठी महत्वाच्या आहेत.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter