Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
सांगली लोकसभेसाठी सव्वासहा लाख मतदारांची मतदानाकडे पाठ

25-Apr-2019 : सांगली / अनिल कदम

निवडणूक विभागाने सातत्याने जनजागृती करूनही लोकसभेच्या निवडणुकीत शंभर टक्के मतदान होऊ शकलेले नाही. लोकसभेच्या मतदानाच्या टक्केवारीत अवघी पावणे दोन टक्क्यांनी वाढ झाली. सांगली मतदारसंघातील थोडेथोडके नव्हे, तर तब्बल ६ लाख २४ हजार २४० मतदारांनी पाठ फिरविल्याचे स्पष्ट झाले. त्यामध्ये महिलांची संख्या अधिक आहे. पुरुष ३ लाख ३ हजार ६२२ तर ३ लाख २० हजार ५६२ महिला मतदानापासून अलिप्त राहिल्या. निवडणूक विभागाने मतदानासाठी प्रयत्न करूनही मतदान प्रक्रियेबाबत एवढी उदासीनता असण्याचे कारण काय?, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. मतदारयादीत नाव नसणे, तसेच मतदारांना मतदानाच्या स्लीपा मिळाल्या नसल्याचा परिणाम दिसून आला.

लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून मतदान १००% होण्यासह निर्भयपणे होण्यासाठी निवडणूक विभागाने कंबर कसली होती. सांगली लोकसभा मतदारसंघात १८ लाख ३ हजार ५४ असे एकूण मतदार आहेत. त्यापैकी ११ लाख ७७ हजार ८१४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाकडे सहा मतदारसंघांमध्ये तब्बल ६ लाख २४ हजार २४० मतदारांनी मतदान प्रक्रियाकडे पाठ फिरविली. ३ लाख ३ हजार ६२१ पुरुषांनी तर ३ लाख ३० हजार ५६२ स्त्रियांनी मतदान केले नसल्याचे स्पष्ट झाले. मतदान न करण्यामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे. सांगली विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वाधिक १ लाख १८ हजार ६३२ अशी मतदान न करणार्‍यांची संख्या आहे, त्यामध्ये ५३ हजार ८६३ पुरुष तर ६१ हजार २८३ महिलांचा समावेश आहे.

मिरज विधानसभा मतदारसंघातील १ लाख १५ हजार १६० मतदारांनी मतदान प्रक्रियेकडे पाठ फिरवली. पुरुष ५५ हजार ८८४ तर ६२ हजार ७२६ महिला मतदारांचा समावेश आहे. पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात ८८ हजार ८४३ जणांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला नाही. त्यामध्ये ४१ हजार ५५१ पुरुष तर ४७ हजार १८८ महिला मतदार आहेत. खानापूर मतदारसंघात १ लाख १४ हजार ४६ जणांनी मतदानाकडे पाठ फिरविली. त्यामध्ये ५८ हजार ३६८ पुरूष तर ५५ हजार ६७४ महिला आहेत. तासगाव- कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात ८८ हजार ८७ जणांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला नाही.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter