Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
सांगली शहरासह जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाची हजेरी

27-Apr-2019 : सांगली / प्रतिनिधी

सांगली जिल्ह्यात उन्हाचा तडाखा भाजून काढत असतानाच अचानक अवकाळी पावसाने दिलासा दिला. सांगली शहरासह जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्याच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. या वादळी पावसाने वातावरणामध्ये काही काळ सुखद गारवा पसरला होता. पावसाबरोबर सोसाट्याच्या वार्‍याने काही ठिकाणी जनजीवनावर परिणाम झाला.

एप्रिल महिना अखेरीस तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सिअस इतका गेला. परिणामी उकाड्याने नागरिकांना हैराण करून सोडलं. शनिवारी सकाळपासून उन्हाचा कडका जिल्ह्यात वाढला होता. सूर्य आग ओकत होता. नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत होती , मात्र सायंकाळी ढगाळ वातावरण झाले आणि वरूणराजाने हजेरी लावली. ग्रीष्माने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाने सुखद धक्का दिला. काही काळ पाऊस जरी पडला असला तरी जमिनीतील उष्णता पुन्हा वाढण्याची भीती आहे.ग्रीष्माने हैराण झालेल्या जिल्हावासियांना सायंकाळी सात वाजल्यानंतर वरूणराजाने सुखद दिलासा दिला. सांगली शहरासह जिल्ह्यातील तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, खानापूर तालुक्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उन्हाने अंगाची काहिली झालेल्या जिल्हावासियांना पावसामुळे सुखद गारवा अनुभवयास मिळाला असला तरी उन्हाच्या झळा दिवसभर बसल्या.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter