Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
सदाभाऊंच्या आमदारकीसाठी ताकदीने काम : आभार दौर्‍यावेळी विशाल पाटील यांची ग्वाही

27-Apr-2019 : विटा / प्रतिनिधी

लोकसभा निवडणूकीत खानापूर विधानसभा मतदारसंघाची भूमिका निर्णायक होती. अशा निर्णायक क्षणी मागचा पुढचा विचार न करता माजी आमदार ऍड. सदाशिवराव पाटील यांनी मला बिनशर्त पाठिंबा देवून निवडणूकीत माझ्यासाठी योगदान दिले. त्याची उतराई म्हणून आगामी विधानसभा निवडणूकीत सदाभाऊंना आमदार करण्यासाठी ताकदीने काम करणार असल्याचे सुतोवाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांनी केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांनी शनिवारी आभार दौर्‍याच्या निमित्ताने विटा येथे माजी आमदार ऍड. सदाशिवराव पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जेष्ठ नेते गंगाधर लकडे, दत्तोपंत चोथे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष रविआण्णा देशमुख, माजी नगराध्यक्ष ऍड. वैभव पाटील, माजी उपनगराध्यक्ष किरण तारळेकर, सागर लकडे, माजी सभापती अविनाश चोथे यांची प्रमुख उपस्थिती होती.

विशाल पाटील पुढे म्हणाले, खासदारपद हे महत्वाचे आहे. ते पद आपल्या विचारांच्या लोकांकडे आणि योग्य व्यक्तीकडे नसल्याने जिल्ह्याचा विकास खुंटला होता. त्यामुळे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि वसंतदादांचा नातू म्हणून मला माझे कर्तृत्व सिध्द करण्याची संधी मी लोकसभा निवडणूकीच्या माध्यमातून जनतेकडे मागितली होती. या निवडणूकीत माजी आमदार सदाभाऊंचा निर्णय होईपर्यंत निवडणूक बरोबरीत चालली होती, अशा निर्णायक परिस्थितीत सदाभाऊंनी मला बिनशर्त पाठिंबा दिल्याने माझा विजय निश्‍चित झाला. सदाभाऊ आणि त्यांच्या टीमने खानापूर विधानसभा मतदारसंघात माझे ताकदीने काम केल्याने या भागातून मला चांगले मताधिक्क्य मिळेल . त्यामुळे या मदतीची जाणीव ठेवणारा मी कार्यकर्ता आहे. दिलेला शब्द आम्ही पाळतो. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकीत खानापूर मतदासंघातून सदाभाऊंना आमदार करण्यासाठी मी ताकदीने काम करणार आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter