Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
शेट्टींच्या मध्यस्थीने दादा-बापू वाद संपुष्टात

27-Apr-2019 : सांगली /प्रतिनिधी

जिल्ह्यात वसंतदादा व राजारामबापू पाटील गटाचा संघर्ष वर्षानुवर्षे होता. लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हा वाद उफाळून येत होता , मात्र या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही गटातील वाद आता संपुष्टात आला आहे. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा.राजू शेट्टी यांनी मध्यस्थी केली होती . राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील व वसंतदादांचे नातू युवा नेते विशाल पाटील यांनी एकत्रित येऊन लोकसभा निवडणुकीत काम केले. राष्ट्रवादीच्या सर्वांनी कधी नव्हे असे दादा गटाच्या उमेदवारासाठी प्रामाणिक व खर्‍या भाषेत करेक्ट काम केले. भविष्यात होणार्‍या विधानसभेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतदेखील हे दोन्ही नेते एकत्र असणार आहेत.

वसंतदादा पाटील व राजारामबापू पाटील यांच्यातील वाद सर्वांना ज्ञात आहे. जिल्ह्यात धरण बांधण्याच्या जागेवरून या दोन्ही नेत्यांचा जोरदार वाद निर्माण झाला होता. या वादाचे पडसाद जिल्ह्यात कायम राहिले. या दिग्गज नेत्यांच्या निधनानंतर देखील त्यांच्या वारसदारांमध्ये वाद कायम राहिला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी जिल्ह्यात दादा गटाचे खच्चीकरण करून राजारामबापू पाटील गट वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बँक, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थेट दादा-बापू गटामध्ये होत होत्या. दादांच्या निधनानंतर स्व.प्रकाशबापू पाटील व स्व.मदनभाऊ पाटील यांनी दादा गटाचे नेतृत्व केले.

सांगली जिल्हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. गेल्या ३५ वर्षांपासून लोकसभेची जागा दादा घराण्याकडे असायची , मात्र या निवडणुकीत दादा गटाच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी अनेक खेळी केल्या जात होत्या. खा.राजू शेट्टी कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोबत आल्याने सांगली लोकसभेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली होती. या निवडणुकीत विशाल पाटील यांनी स्वाभिमानीची उमेदवारी घेतली. आघाडी असल्याने निवडणुकीच्या प्रचार शुभारंभाला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील आले होते. त्यावेळी त्यांनी दादा-बापू वाद नसल्याचे स्पष्ट करत दादांच्या आठवणी सांगितल्या , तर निवडणुकीत विशाल पाटील यांना निवडून आणण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती. आ.जयंत पाटील विशाल पाटलांच्या प्रचारात सक्रीय असल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे शिलेदारदेखील दादा-बापू वाद विसरून विशाल पाटील यांच्या प्रचारात सक्रीय झाले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी देखील विशाल पाटील यांच्या प्रचारात तासगावात सभा घेतली होती. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांत दादा-बापू वाद जिल्ह्यात दिसलाच नाही.

तसेच राजारामबापू पाटील यांचे नातू व आ.जयंत पाटील यांचे सुपुत्र राजवर्धन पाटील यांनी देखील विशाल पाटील यांना फेसबुकवरून निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. शिवाय दादा-बापू वाद कधी ऐकला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे दादा-बापू वादाला पूर्णविराम मिळाल्याचे सध्याचे चित्र आहे. भविष्यात विधानसभा, जिल्हा मध्यवर्ती बँक व सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आहे. या निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी दादा-बापू वाद विसरून सर्व नेते एकत्र येण्याची शक्यता आहे , तशी आशादेखील कार्यकर्ते करू लागले आहेत. त्यामुळे दादा-बापू वादाला आता पूर्णविराम मिळणार आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter