Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
तासगावात सोन्याचे बिस्कीट देऊन फसवणूक

02-May-2019 : तासगाव / प्रतिनिधी

एक लाख रुपयांचे दहा तोळ्यांचे सोन्याचे बिस्किट आहे असे सांगून तालुक्यातील बंजारवाडी येथील एका ८० वर्षीय आजीच्या गळ्यातील ३० हजार रुपयाची सव्वा तोळ्याची सोन्याची बोरमाळ घेऊन फसवणूक केली आहे. या प्रकरणी दोघा अज्ञात व्यक्तिंविरुध्द तासगांव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तासगावात २२ दिवसांत अशा दोन घटना घडल्या आहेत. या प्रकरणी तालुक्यातील वंजारवाडी येथील गुणाबाई दगडू खोत (वय ८०) यांनी ४० वर्षीय व ८० वर्षीय अशा दोघा अज्ञात व्यक्तिंविरुध्द फिर्याद दिली आहे

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी या मंगळवार दि.३० एप्रिल रोजी सकाळी ११ च्या दरम्यान कामानिमित्त वंजारवाडी येथन एस टी ने तासगांवात आल्या होत्या. बँकेतील व इतर कामे ऊरकून भाजीपाला घेऊन पुन्हा सायंकाळी ४ च्या दरम्यान गावाकडे जाण्यासाठी त्या निघाल्या एस. टी. स्टॅन्डकडे जात असताना स्टॅन्ड चौक येथे एका बेकरीतून त्यांनी खारी वगैरे खरेदी केली. त्या रस्ता पार करू लागल्या. याच दरम्यान विटा रोड येथून एक ट्रक येत होता तेवढ्यात पाठीमागून त्यांच्याजवळ अनोळखी अंदाजे ४० वर्षांचा इसम आला.

फिर्यादी यांना त्यानेे डाव्या हाताने पाठीमागे सारले व त्यांना रोडच्या पलीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळून छत्रपती शिवाजी महाराज व्यापास संकुलातून स्टॅन्डकडे जाणार्‍या रोडकडे नेले ,व भाजी मंडईचे बाजूस असलेल्या लोखडी कॉटवर बसवले. त्यानंतर त्याने अंदाजे ८० वर्ष वयाच्या इसमाला हाक मारली.

त्यावेळी त्या दोघांनी त्यांच्याकडे सोन्यासारखे दिसणारे बिस्कीट दाखविले व हे दहा तोळ्यांचे आहे. आपण हे सोने वाटून घेवू या, त्या सोन्याची किंमत एक लाख रूपये आहे असे फिर्यादी यांना सांगितले. फिर्यादी यांना कानातील फुले काढ, गळ्यातील ३० हजार रुपये किंमतीची बोरमाळ काढ असे ते म्हणाले त्यांवर फिर्यादी या कानातील फुले निघत नाहीत , मला सोने वगैरे काही नको असे म्हणत असताना त्यांना चक्कर आल्यासारखे वाटू लागले त्यावेळी त्यांनी आपल्या गळ्यातील बोरमाळ त्याच्या हातात दिली व ते दोघे तेथून निघून गेले. त्यानंतर फिर्यादी यांची आपली फसवणूक झाल्याची खात्री झाली.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter