Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
विवाह होत नसल्याने मिरजेत वकिलाची आईसह आत्महत्या

02-May-2019 : मिरज / प्रतिनिधी

येथील गुरूवार पेठ येथे राहणार्‍या पुष्पा सुरेश अग्रवाल (वय ७०) यांनी कृष्णा नदीमध्ये उडी मारुन आत्महत्या केली तर त्यांचा मुलगा ऍड. सुनिल सुरेश अग्रवाल (वय ४७) यांनी रेल्वेखाली स्वत:ला झोकून देवून आत्महत्या केली आहे. पुष्पा अग्रवाल यांची मिरज शहर पोलिसात नोंद झाली असून ऍड.सुनिल अग्रवाल यांची मिरज रेल्वे पोलिसात नोंद झाली आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, गुरूवार पेठ येथे पुष्पा अग्रवाल या आपला वकील मुलगा ऍड. सुनिल अग्रवाल सोबत राहत होत्या. मुलाच्या विवाहासाठी त्यांची खटपट सुरू होती. मुलाचा विवाह जमत नसल्यामुळे पुष्पा अग्रवाल या अतिशय नाराज होत्या. त्यांचीही मनस्थिती चांगली नव्हती.

तर ऍड.सुनिल अग्रवाल हे मिरज कोर्टमध्ये काम करीत होते. अनेक वर्षापासून वकीली व्यवसायाबरोबरच इतर व्यवसायही ते करीत होते. गांधी चौक येथे असलेले दुकान गाळे त्यांनी भाड्याने दिले होते. ऍड.सुनिल अग्रवाल हे नेहमी गांधी चौक येथे आपल्या दुकानाजवळ कायम थाबत होते. सुनिल अग्रवाल यांचा विवाह जमत नसल्याने तेही कायम नाराज व द्विधा मन:स्थितीत असायचे. आई व मुलाची दोन दिवसांपासून मन:स्थिती बिघडलेली होती. दोघेही नाराज होते.

दरम्यान मिरज कृष्णाघाट येथील स्मशानभूमी जवळ (एम.एच.१० बी.एफ. ६८९५) या क्रमांकाची व वकीलांंचा लोगो असलेली गाडी व लेडीच चप्पल पडलेली आढळून आली. कृष्णाघाट येथे राहणारे सामाजिक कार्यकर्ते सुनिल मोरे यांनी बेवारस गाडी व चप्पल याबाबतची माहिती मिरज शहर पोलिसांना दिली. पोलिसांनी ही गाडी ताब्यात घेतली. गाडीबाबत माहिती काढली असता ही गाडी सोहेल सय्यद यांच्या नावावर असून ती गाडी ऍड. सुनिल अग्रवाल यांना दिल्याचे समजले , नंतर पोलिसांनी अग्रवाल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. गाडी दोन दिवस कृष्णाघाट येथे असल्याने अग्रवाल यांच्या नातेवाईकांनी पुष्पा अग्रवाल यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. गुरूवारी कृष्णा नदीपात्रात कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह तरंगताना दिसला. पोलिसांनी गाडीच्या अनुषंगाने अग्रवाल यांच्या नातेवाईकांना बोलावून घेतले.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter