Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
तासगाव तालुक्यातील सावर्डेत आमिर खानचे सपत्नीक श्रमदान

02-May-2019 : तासगाव / प्रतिनिधी

माणूस आशा व आत्मविश्वास जर गमावून बसला तर तो कितीही ताकतीचा असला तरी उपयोग होत नाही. पण या गोष्टी कमजोर माणसाकडे जरी असतील तर तो हिमालय सर करू शकेल. लोकांच्या श्रमदानातून महाराष्ट्र लवकरच दुष्काळमुक्त व पाणीदार बनणार आहे , प्रत्येक गाव एक झाल्यास सर्वच समस्या सुटतील असे मत अभिनेता आमीरखान यांनी रविवारी व्यक्त केले. पत्नी किरण राव यांच्यासोबत त्यांनी तासगाव तालुक्यातील सावर्डे गावाला भेट दिली, यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले ५ वर्षांपूर्वी पाणी फौंडेशनच्या या स्पर्धेची सुरवात करताना भीती वाटत होती. लोक येतील का? काम करतील का यांसह अनेक प्रश्न सतावत होते , पण ज्या वेळू गावात एका वर्षांपूर्वी ७५ वेळा हातपंप मारल्यावर पाणी येत होतं तेच पाणी आता एका हातपंपामध्ये येतं. हा चमत्कार आहे. यावेळी जर एका वेळी पंप मारल्यावर पाणी नाही आलं तर मी अभिनय सोडेन असे आव्हान दिले होते. मात्र लोकांच्या कष्टाच्या व गावाच्या एकीच्या बळावर हे सर्व शक्य झाले आहे. तुम्ही जे काम करतायं ते महाराष्ट्र बघेल व त्यांना प्रेरणा मिळेल.

यावेळी बोलताना आमीर खान म्हणाले आपल्या आपल्या ताकतीने गावं पाणीदार होत आहेत. त्याचा आनंद सांगू शकत नाही व त्याची किंमत होऊ शकत नाही. आमच्या अडचणींवर आपणच मार्ग शोधून इलाज करू शकतो. प्रशासनालाही त्यांनी यावेळी धन्यवाद दिले. जनता व प्रशासन एकत्र आल्यास अशक्य काहीच नसल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना किरण राव म्हणाल्या की, इथे येऊन मला खूप फरक पडलाय. लोक स्वत: काम करून आपल्या समस्या सोडवत असतील तर ते असाधारण आहे. आमच्या हातांनी आम्ही काहीतरी करून देशाची परिस्थिती बदलू शकतो. मात्र त्यातही गावे व शहरांनी एकत्र येण्याची गरज आहे. सर्व गावे आपले आपले मतभेद बाजूला ठेऊन एकत्र आले आहेत, त्यामुळे महाराष्ट्र लवकरच पाणीदार होणार असे त्यांनी सांगितले. नमस्कार मित्रानो असं म्हणत दोघांनी एकत्र मराठीतूनच बोलण्यास सुरवात केली. शहरातून आलेल्या जलमित्रांचे त्यांनी आभार मानले.

यावेळी बोलताना डॉ. अविनाश पोळ म्हणाले लग्न दोन व्यक्तींचं हाय पण सारा गाव झटायला लागलाय मात्र उशिरा का होईना तांदूळ टाकायला मोठा पाहुणा आलाय. पूर्वीच्या काळी सोन्याच्या हंड्याची चोरी व्हायची पण आता पाण्याच्या हंड्याची चोरी होणार आहे. पाणीच शहर व खेड्यातल अंतर वाढवणार आहे . शेतक़र्‍यांसाठी बांधलेली धरणं शहरांसाठी वापरली जाताहेत मग शेतीसाठी काय? म्हणूनच शहरातील लोकांना खेड्यात नेण्याचं हे आंदोलन आहे. काम वाढलं तर ही पाणी चळवळ मोठी होईल . लोकांच्या हृदयात शिरून आम्ही माणूस जोडला तोच माणूस दुष्काळाला हद्दपार करेल. व भविष्यात ‘ पाण्यासाठी तहानलेल गाव दाखवा व २ लाख रुपये बक्षीस मिळवा’ अशी वेळ येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अभिजित चौधरी म्हणाले की आता सर्वांना पाण्याचे महत्व आता पटले आहे. या जलसंधारणातून गावोगावी मनसंधारण झाले आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter