Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
इस्लामपुरात मोटरसायकल चोरट्यांची टोळी जेरबंद

06-May-2019 : इस्लामपूर / प्रतिनिधी

मोटरसायकल चोरी करणार्‍या आंतर जिल्हा टोळीचा छडा लावण्यात इस्लामपूर पोलिसांना यश आले आहे. ५ लाख रूपये किंमतीच्या १६ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता बुधवार दि. ८ मे पर्यंत पोलिस कोठडी ठोठावल्याची माहिती पोलिस उपअधिक्षक कृष्णात पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मोटरसायकल चोरी करणार्‍या टोळीतील विजय बाळासो कोळी (वय २८, रा.रेठरेधरण), अक्षय उमेश सोनवणे (वय ३१, रा.पिंपरी पुणे), निलेश सुरेश राठोड (वय २४, रा. पुणे स्टेशन मागे, पुणे), सलिम अब्दुल शेख (वय २४, रा.सोलापूर) या चौघांना जेरबंद करण्यात आले. इस्लामपूर पोलिस ठाणे हद्द व परिसरातील विविध ठिकाणांहून मोटरसायकल चोरीच्या घटना घडल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधिक्षक सुहेल शर्मा व अप्पर पोलिस अधिक्षक शशिकांत बोराटे यांनी कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. पोलिस उपअधिक्षक कृष्णात पिंगळे व पो.नि.नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूर पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पो.हे.कॉ.गजानन जाधव, पो.कॉ.आनंद देसाई, पो.कॉ.सुरज जगदाळे या पथकाला चोरीतील मोटरसायकलची डिल पेठ नाका येथे होणार असल्याची माहिती मिळाली. बुधवार दि.१ मे रोजी पो. हे.कॉ.गजानन जाधव, गणेश मोहिते, पो.ना.अमोल चव्हाण, पो.कॉ.आनंद देसाई, सुरज जगदाळे, गणेश शेळके, संताजी पाटील, चंद्रकांत कोळी, पो.कॉ.आवळे यांच्या पथकाने पेठ नाका येथे सापळा रचला. पुणे येथील अक्षय सोनवणे, निलेश राठोड व सोलापूर येथील सलिम शेख हे रेठरेधरण (ता.वाळवा) येथील विजय कोळी याच्याशी मोटरसायकलची डिल करण्यासाठी आले होते. या चौघांना मोटरसायकलींसह ताब्यात घेतले.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter