Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
मंत्र्यांकडून दुष्काळी दौर्‍यांचा फार्स नको, कृती हवी : खा.राजू शेट्टी

06-May-2019 : सांगली / प्रतिनिधी

जिल्ह्यात दुष्काळाची भीषणता निर्माण झाली आहे. राज्यातील मंत्र्यांकडून दुष्काळी दौर्‍याचा फार्स सुरु आहे. केवळ मंत्र्यांचे दौरे नकोत, दुष्काळ ग्रस्तांचे प्रश्‍न सोडवा , अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिला. आचारसंहितेचे कारण पुढे करून शासन ढिम्म झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

सांगली येथे एका कार्यक्रमासाठी खा. शेट्टी आले असता त्यांनी दुष्काळी परिस्थितीवरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला .

२३ एप्रिल रोजी सांगलीसह पश्‍चिम महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुका संपल्या आहेत. आयोगानेसुद्धा दुष्काळी उपाय योजनांसाठी आचारसंहितेची कसलीही अडचण येणार नाही, हे स्पष्ट केले आहे. असे असताना कार्यक्षमपणे राज्यातील दुष्काळ निवारणासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते , पण तसे होताना दिसत नाही , असा आरोप शेट्टी यांनी सरकारवर केला आहे. तसेच अवघा महाराष्ट्र दुष्काळाने होरपळून निघत आहे. जनावरे चारा आणि पाण्याअभावी तडफडून मरत असताना चारा छावण्यांबाबत अनेक अडचणी निर्माण करण्यात आल्या. छावण्यांसाठी जाचक अटी लादण्यात आल्याने त्या सुरु करण्यात प्रशासनाला अडथळे येत असल्याचे स्पष्ट झाले.

दुष्काळी भागातील शेतक़र्‍यांची अवस्था ही ‘भीक नको, पण कुत्रं आवर’ अशी झाली आहे. सरकारी यंत्रणाही आचारसंहितेच्या नावाखाली सुस्त असून दुष्काळाकडे दुर्लक्ष करत आहे. राज्य सरकारच्या कार्यक्षमतेमुळे आज दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांची अवस्था वाईट झाली आहे. राज्यातील दुष्काळी भागात तातडीने उपाय योजना करण्याच्या मागणीसाठी विभागीय आयुक्तांना भेटणार असल्याचेही खा. शेट्टी यांनी स्पष्ट केले.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter