Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
महापालिकेचा मिरजेतील लिपीक लाचलुचपतच्या जाळ्यात

06-May-2019 : मिरज / प्रतिनिधी

सांगली, मिरज आणि कुपवाड़ शहर महानगरपालीकेच्या मिरज विभागीय कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ लिपीक अजित धनपाल राजमाने (वय ५२ रा. अमरजा अपार्टमेंटजवळ, घर नं ३९११/अ किल्ला भाग, मिरज) यास १ हजार रूपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगहात पकडले. महापालिका क्षेत्रात यामुळे खळबळ माजी आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अजित राजमाने हे विवाह नोंदणी विभागामध्ये कनिष्ठ लिपीक म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्या मुलीचा विवाह झाला असून सदर विवाहाची नोंद महानगर पालीका, मिरज येथे होवून विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र मिळण्याकरीता तक्रारदार यांनी महानगरपालिकेच्या मिरज कार्यालयातील विवाह नोंदणी विभागात अर्ज दिला होता. याप्रकरणी तक्रारदाराने अनेक हेलपाटे घातल्यानंतर त्यांनी या संदर्भात अडचण काय आहे अशी विचारणा केली. तेव्हा तक्रारदार यांच्या मुलीच्या लग्नाची नोंद होवून विवाह नोंदीचे प्रमाणपत्र देण्याकरीता राजमाने यांनी शासकीय फी व्यतिरीक्त पैसे मागितले. अखेर हा सौदा एक हजार रूपयांवर झाला. १ हजार रूपये अधिक दिल्यास नोंदणीपत्र लगेच देण्यात येईल असे यावेळी तक्रारदारांना सांगण्यात आले. या संदर्भात तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागामध्ये तक्रार केली.

तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पडताळणीमध्ये अजित राजमाने यांनी तक्रारदार यांच्याकडे १ हजार रुपयांची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सांगली , मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालीकेच्या मिरज विभागीय कार्यालयात सापळा लावण्यात येवून अजित राजमाने यांना १ हजार रूपयांची लाच स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले . त्यांच्याविरुध्द मिरज शहर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमा खाली गुन्हा दाखल केला आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter