Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
सांगलीत शिवजयंती उत्साहात

06-May-2019 : सांगली / प्रतिनिधी

सांगली शहर व परिसरात परंपरेनुसार शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अवघे शहर शिवमय झाले होते.या वर्षी शिवजयंतीचा उत्साह अधिकच जाणवत होता.अन्य सण, समारंभाप्रमाणे आणि उत्सवांप्रमाणे फेसबूकवरून अनेकांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

शिवजयंतीच्या निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठानच्यावतीने शिवछत्रपतींना ७ नद्यांमधून तसेच ७ गडावरून आणलेल्या पाण्याने व दुधाने अभिषेक करण्यात आला. रामभाऊ बापट व ११ महिलांनी ‘रुद्र’ म्हटले. राजू शहापूरे यांनी अभिषेक मंत्र सांगितला. सायंकाळ्च्या सत्रात शेकडो महिला पुरुषांच्या उपस्थितीत शिवजन्माचा पाळणा म्हणण्यात आला. शाहीर मोहन यादव यांनी पोवाडा म्हटला. सकाळपासूनच अनेक मंडळांनी भिडेगुरुजींच्या हस्ते शिवज्योत प्रज्वलित करून नेली. शिवपुतळ्याच्या सभोवती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.यावेळी संभाजीराव भिडे(गुरुजी) , नितीन चौगुले, अविनाश सावंत, आनंदराव चव्हाण, मंगेश तांदळे, सुरज पाटील, प्रदीप पाटील, अंकुश जाधव, हणमंत पवार, हरिहर तानवडे, सचिन मोहिते, राजेंद्र पुजारी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

सालाबादप्रमाणे वंदेमातरम् व्यायाम मंडळ यांच्यावतीने राजवाडा चौक, येथे मोठ्या थाटामाटात ‘वंदेमातरम् शिवोत्सव - २०१९’ ची सुरुवात माजी आ . नितीन शिंदे व नगरसेविका ऍड. स्वाती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आली. राजवाडा चौक येथे पुणे येथील शनिवार वाड्याची भव्य प्रतिकृती व भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे, तसेच आकर्षक विद्युत रोषणाईदेखील करण्यात आली आहे. हे भव्य व्यासपीठ सांगलीकरांचे लक्ष वेधून घेत आहे.

यावेळी बोलताना आमदार सुरेशभाऊ खाडे म्हणाले की, शिवजयंतीचा अभूतपूर्व उत्साह आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि त्यांचे अनुकरण प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. शिवाजी महाराज हे आमचे प्रेरणास्रोत आहेत.

यावेळी नितीन शिंदे म्हणाले की , आता शिवजयंती दिल्लीत साजरी होत आहे, आता यापुढे पाकिस्तानात शिवजयंती साजरी करण्याचे उद्दिष्ट्य आपण ठेवले पाहिजे . शिवजयंतीचे तीन तुकडे आम्हाला मान्य नाहीत. राज्यात, देशात तिथीनुसार एकच जयंती झाली पाहिजे.

या शिवोत्सवामध्ये दि. ६ मे २०१९ ते दि. १० मे २०१९ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन वंदेमातरम् व्यायाम मंडळाच्यावतीने करण्यात आले आहेत. तसेच याची सांगता दि. १० मे २०१९ रोजी सायंकाळी ठिक ५:०० वा.भव्य मिरवणूक काढून होणार आहे. तरी सर्व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन माजी आम. नितीन शिंदे यांनी केले.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter