Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
भाजपची सत्ता येऊनही मुलभूत सुविधा दूरच

06-May-2019 : सांगली / शरद पवळ

केंद्र व राज्यात सत्ता असलेल्या भाजपला नागरिकांनी महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या दिल्या. मनपा क्षेत्रात विकासाची अपेक्षा होती. मात्र सत्तेवर येवून नऊ महिने पूर्ण झाले तरी जनता ‘अच्छे दिन’ची आजही वाट पाहत आहे. मुख्यमंत्र्यांनी शंभर कोटी जरी जाहीर केले असले तरी अद्याप हा निधी प्रशासनाच्या लाल फितीत अडकला आहे. यामध्ये रस्ते व भाजी मंडईवर निधीची खैरात केली आहे. नागरिकांना रस्त्यांऐवजी स्वच्छ व मुबलक पाणी, ड्रेनेज सुविधा, कचरा उठाव, गुंठेवारी सुविधा हव्या आहेत, मात्र सत्ताधारी भाजपने जनतेला आवश्यक असणार्‍या सोयींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. आ.सुधीर गाडगीळ यांच्या दृष्टीने केवळ रस्ते करणे म्हणजे विकास असे समिकरण झाले आहे , मात्र या रस्त्यांवरील बाजार व अतिक्रमणे तशीच असल्यामुळे व दिवसेंदिवस ती वाढत असल्यामुळे प्रत्यक्षात रस्त्यांचा लाभ नागरिकांऐवजी फेरीवाल्यांनाच होताना दिसत आहे. रस्ते झाले तरी वीजेचे खांब तसेच असल्यामुळे त्याचाही फायदा जनतेला होत नाही.

सन २००८ वगळता महापालिकेत स्व.मदनभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ता असायची. २००८ ला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी महाआघाडीचा प्रयोग केला होता. त्यांना यश मिळाले होते., मात्र ही सत्ता पाच वर्षे टिकली नाही, तर पाच वर्षानंतर झालेल्या निवडणुकीत पुन्हा कॉंग्रेसला सत्ता मिळाली. मात्र २०१८ च्या निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी प्रथमच एकत्र आली होती. तर भाजपने प्रथमच स्वबळावर निवडणूक लढवत एक हाती सत्ता मिळविली. केंद्र व राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात भाजपची सत्ता आल्यास शासनाकडून निधी मिळण्याची अपेक्षा नागरिकांना होती. भाजपच्या नेत्यांनी व सांगली, मिरजेच्या आमदारांनी महापालिकेच्या जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविले. जनतेने देखील त्यांच्यावर विश्‍वास ठेवला आणि सत्ता दिली. या सत्तेला नऊ महिने पूर्ण होत आहेत, मात्र विकासाचा ठोस मुद्दा दिसून येत नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर नगरोत्थान योजनेतून शंभर कोटींचा निधी जाहीर केला. ऑगस्ट महिन्यात निधी मंजुरीचे पत्र आले होते, मात्र प्रस्ताव तयार करणे, मंजुरी मिळविणे यामध्ये सहा महिने गेले आहेत. आता निविदा प्रक्रिया सुरू आहे , मात्र आचारसंहितेमुळे निविदा खुल्या केल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शंभर कोटींच्या निधीतून भाजपच्या नेत्यांनी मनपा क्षेत्रातील रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात घेतली आहेत. नागरिकांच्या मुलभूत प्रश्‍नांकडे दुर्लक्ष केले गेले असल्याचे चित्र आहे. कृष्णा नदी हाकेच्या अंतरावर आहे. मात्र सांगली व कुपवाड शहरात आजही अपुरा पाणीपुरवठा होत आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter