Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
सांगली लोकसभेचा निकाल दुसर्‍या दिवशी लागणार?

15-May-2019 : सांगली / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी २३ मे रोजी सकाळी आठ वाजता सुरु होणार असून निवडणूक विभागाकडून तयारी जोमात आहे. निवडणुकीचा अंदाज येण्यासाठी सायंकाळचे चार वाजतील. सायंकाळी पाचपर्यंत कोण बोजी मारणार हे समजण्याची शक्यता आहे. मतांचा फरक कमी असेल तर शेवटच्या चार-पाच फेर्‍यांपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे लोकसभेचा अंतिम निकाल जाहीर करण्यासाठी २४ मे रोजी पहाटे पाच वाजण्याची शक्यता आहे.

मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासकीय तयारी सुरु झाली आहे. जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांचे गुरुवारी मुंबईत प्रशिक्षण आहे, तर दोन दिवसांनी सहाय्यक निवडणूक अधिकार्‍यांसाठी जिल्ह्यात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले असताना निवडणूक आयोगाच्या सूचना, निवडणूक शाखेच्या तयारीवर संपूर्ण प्रकिया पार पाडण्यासाठी २३ मे रोजी सकाळी सहा ते २४ मे रोजी सायंकाळी किमान ५ वाजतील, असा अंदाज आहे. सांगली लोकसभेसाठी मतमोजणीच्या १९ फेर्‍या होतील. १२० टेबल्सवर मतमोजणीसाठी ५४० कर्मचारी असतील. टपाली मतमोजणी, रॅडम पध्दतीने मतमोजणी आणि ईव्हीएम वाहतुकीसाठी शिपाई मोठ्या संख्येने लागणार आहेत.

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी २३ मे रोजी मिरज येथील शासकीय धान्य गोदामात होणार आहे. मतमोजणीसाठी कर्मचार्‍यांना १६ मे रोजी प्रशिक्षण तर २२ मे रोजी मतमोजणीची रंगीत तालिम होणार आहे. मतमोजणीसाठी कर्मचारी सकाळी सहा वाजता येतील. सुरक्षा कक्ष सात वाजता उघडेल. सकाळी ८ वाजल्यापासून प्रत्यक्षात ईव्हीएमची मतमोजणी सुरू होईल. प्रथम टपाली मतमोजणी होईल. त्यानंतर अर्ध्या तासांनी कंट्रोल युनिटमधील मतमोजणी सुरू होईल. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय निवडलेल्या (रँडमली सिलेक्टेड) ५ व्हीव्हीपॅट स्लीप मोजणी करण्यात येईल.

सांगली लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. टपाली मतमोजणी १० टेबल्सवर होणार आहे. प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी निरीक्षक, एक मतमोजणी सहाय्यक, एक सूक्ष्म निरीक्षक आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी उपस्थित असेल. सांगली लोकसभा मतदार संघातील प्रत्येक विधानसभानिहाय निवडलेल्या (रँडमली सिलेक्टेड) ५ व्हीव्हीपॅट स्लीप मोजणी पूर्ण झाल्याशिवाय शेवटची फेरी मोजली जावू नये, असे आदेश आहेत. अर्थात १९ व्या फेरीत खानापूर विधानसभेतील ८ मशिनचे मतदान शिल्लक राहिल.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter