15-May-2019 : सांगली / प्रतिनिधी
दुष्काळी परिस्थितीत दिलासा देण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून प्राप्त मागणीनुसार १५९ तलावांपैकी १३० तलाव उपसा सिंचन योजनेच्या पाण्यातून भरून घेतले आहेत. उर्वरित तलाव भरून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी बुधवारी दिले.
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर पाणी टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले, पाटबंधारे विभागाचे विविध विभागांचे कार्यकारी अभियंता सर्वश्री ना. शं. करे, सु. मा. नलवडे, प्रशांत कडुसकर, वि. पां. पाटील, सं. कु. पवार, प्र. रा. पाटील, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता डी. जे. सोनावणे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) किरण कुलकर्णी आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, म्हणून पाणीपुरवठा योजनांचे स्त्रोत उपसा सिंचन योजनांमधून भरून घेण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून १५९ तलाव भरून घेण्याची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी सद्यस्थितीत १३० तलाव भरून घेण्यात आले आहेत. उर्वरित तलाव भरून घेण्याची कार्यवाही करावी, असे ते म्हणाले.
|