21-May-2019 : सांगली / प्रतिनिधी
येथील शंभर फुटी रस्त्यावरील बेवारस व गॅरेज मालकांनी दुरूस्तीसाठी लावलेल्या सहा गाड्या महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने मंगळवारी जप्त केल्या आहेत. या रस्त्यावर गॅरेज मालकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याने महापालिकेच्या पथकाने ही कारवाई केली.
शंभर फुटी रस्त्यावर गॅरेज मालकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. काही गाड्या रस्त्यावर वर्षांनुवर्षे पडून आहेत , तर अनेकांनी गाड्या दुरूस्तीचा व्यवसाय रस्त्यावरच थाटला आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीस प्रचंड अडथळा निर्माण होत आहे. महापालिकेने याबाबत काही गॅरेज मालकांना नोटीसादेखील दिल्या होत्या , मात्र या नोटीसीला केराची टोपली दाखविली आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने या रस्त्यावर कारवाईची मोहिम राबविली होती. या मोहिमेवेळी गॅरेज मालकांनी आपली वाहने रस्त्यावरून बाजुला काढली. मात्र मोहिम गुंडाळल्यानंतर पुन्हा वाहने रस्त्यावर लावली. त्यामुळे आयुक्तांनी संबंधित वाहनांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख दिलीप घोरपडे व सहाय्यक आयुक्त एस.एस. खरात यांच्या पथकाने मंगळवारी या परिसरात मोहिम राबविण्यात आली. या रस्त्यावर लावलेली बेवारस सहा वाहने क्रेनच्या सहाय्याने उचलून जप्त करण्यात आली.
|