Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
दुष्काळ : सांगली जिल्ह्याबाबत शासनाकडून दुजाभाव

21-May-2019 : सांगली / प्रतिनिधी

कॉंग्रेेस पक्षाच्यावतीने आपण शिष्टमंडळासह सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ या ठिकाणी दुष्काळी दौरा केला. तेथील जनतेच्या भावना लक्षात घेता शासनाने सांगली जिल्ह्याबाबतीत दुजाभाव व दुर्लक्ष केल्याचा आरोप आ.विश्‍वजीत कदम यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केला. या बाबतीत आपण विधीमंडळ अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचेही ते म्हणाले.

आ.विश्‍वजीत कदम पुढे म्हणाले, कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने चारा छावण्या व जळालेल्या डाळींब बागांची प्रत्यक्ष पाहणी केली. तिन्ही तालुक्यांतील शेतकर्‍यांशी थेट संंवाद साधला. शेतकर्‍यांच्या अडचणी समजून घेण्यात राज्यशासन कमी पडत असल्याची भावना आम्हाला जाणवली. जनावरांच्या छावण्या सुरु करण्यासाठी जे निकष लावण्यात आले आहेत ते अत्यंत चुकीचे आहेत. सोलापूर जिल्ह्यात एक निकष व सांगली जिल्ह्याला एक निकष असा प्रकार सुरु आहे. सोलापूर जिल्ह्यात चारा छावण्यासाठी एक लाख रुपये डिपॉझीट असताना सांगलीत मात्र पाच लाख रुपये डिपॉझीट घेतले जात आहे. जनावरांच्या संख्येबाबतही दुजाभाव सुरु आहे. छावणी मंजूर करण्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी घेतला जात आहे. पालकमंत्र्यांचे कमालीचे दुर्लक्ष दुष्काळी भागाकडे आहे. निर्णय लवकर घेतले जात नाहीत. सन २०१२ साली कॉंग्रेसच्या काळामध्ये प्रती जनावर ९० रु. दिले जात होते तीच मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे. सात वर्षांच्या वाढीव महागाईची दखल घेण्यात आलेली नाही. ही रक्कम १३० रु. प्रति जनावर करावी, अशी आमची मागणी आहे. छोट्या जनावरांसाठी ९ किलो तर मोठ्या जनावरांसाठी १८ किलो चार्‍याची मर्यादा आहे , ती १० किलो व २० किलो अशी वाढवावी, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे. शेतकर्‍याला पाच जनावरांची मर्यादा घालण्यात आली आहे ती अन्यायकारक आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter