21-May-2019 : सांगली / प्रतिनिधी
जिल्ह्याला दुष्काळी योजना त्वरित लागू कराव्यात, तसेच दुष्काळी गावांच्या संख्येच्या प्रमाणात ‘गाव तिथं चारा छावणी’ सुरू करण्यात यावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर गाढव मोर्चा काढण्यात आला.
राज्य सरकारला जाग आणण्यासाठी तसेच जनतेच्या भावना शासन दरबारी पोहोचवण्यासाठी बहुजन वंचित आघाडीच्यावतीने गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली गाढव मोर्चा काढून जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांना निवेदन देण्यात आले. वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गाढव, घोडा, शेळ्या-मेंढ्या यांच्यासाठी त्वरित चारा छावण्या चालू कराव्यात, इतर जनावरांप्रमाणे त्यांना अनुदान द्यावे. चारा छावण्यांतील जनावरांसाठी अनुदान देण्यात येते, त्यामुळे शाळा चालू करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. सांगली जिल्ह्यातील अनेक गावांना दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. जनावरांच्या चार्यासह पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
दुष्काळी गावांच्या संख्येच्या प्रमाणात ‘गाव तिथं चारा छावणी’ सुरू करण्यात यावी. चारा छावण्यांसाठी जाचक अटी लादण्यात आल्यामुळे त्या सुरू करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळेे छावण्यांच्या जाचक अटी शिथिल करण्यात याव्यात, टेंभू, म्हैसाळ, ताकारी आणि आरफळ या योजनांची आवर्तने निश्चित करावित, त्यामध्ये लोकप्रतिनिधींचा होणारा हस्तक्षेप थांबवावा , दुष्काळी भागात पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात यावे. ज्या गावांमध्ये पाण्याच्या टँकरची सुविधा नाही, अशा ठिकाणी पाण्याची सुविधा देण्यात यावी.
|