Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
आरवडेत किरकोळ वादातून हाणामारी, घरावर दगडफेक

30-May-2019 : तासगाव / प्रतिनिधी

आरवडे (ता. तासगाव) येथे सुरु असलेल्या लग्नाच्या गावदेवमध्ये चारचाकी वाहन बाजुला घ्या, असे सांगितल्याच्या कारणावरुन नऊ जणांच्या टोळक्याने घरात घुसून दगडफेक करुन हाणामारी केली. बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. या मारहाणीत हेमंत चव्हाण, भानुदास चव्हाण, चुलत भाऊ राहूल रघुनाथ चव्हाण, योगेश तानाजी चव्हाण हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी हेमंत भानुदास चव्हाण (वय ३१, रा. आरवडे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अनिकेत पाटील, सुशांत शिंदे (रा. आरवडे), योगेश जाधव (रा. तासगाव), आकाश संतोष माने (रा. गणेश कॉलनी, तासगाव), अमोल संजय कुंभार (रा. निमणी रस्ता, तासगाव), अजय गजानन साळुंखे (रा. विटा नाका, तासगाव), मोहित संजय शिवणकर, सुरज तुकाराम पाटील (दोघेही रा. चिंचणी), संकेतकुमार तात्यासाहेब माने (रा. शेळकेवाडी, ता. कवठेमहांकाळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत तासगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, हेमंत यांच्या भावाचे गुरूवारी लग्न होते. त्यासाठी बुधवारी रात्री गावामध्ये गावदेव सुरू होते. रात्री साडेनऊच्या सुमारास गावदेव सुरू असताना अनिकेत पाटील, सुशांत शिंदे व योगेश जाधव या तिघांची चारचाकी गाडी आडवी आली. यावेळी हेमंत यांच्यासह अन्यजणांनी गावदेव सुरू आहे, जरा गाडी बाजूला घ्या, असे सांगितले. यावेळी त्यांच्यात वादावादी झाली. यावेळी दमदाटी करत वरील तिघांनी बघून घेतो, म्हणून निघून गेले. यानंतर गावदेव झाल्यानंतर हेमंत व त्यांचे कुटुंब, पाहुणे रात्री सर्वजण घरामध्ये जेवण करीत असताना वरील तिघांसह त्यांच्या अन्य साथीदारांनी घरावर दगडफेक सुरू केली. यावेळी घरात पाहुणे आहेत, येथे दंगा करु नका, असे सांगण्यास आलेल्या हेमंत व त्यांचे वडिल, भाऊ यांना शिवीगाळ करुन मारहाण करण्यात आली. यामध्ये हेमंत यांच्या पायाला दगड लागला. त्यांच्या गळ्यातील बारा ग्रॅम वजनाची सोन्याची चेनही गहाळ झाली. या प्रकारणाची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पोलिस येताच काही जण पळून गेले, तर काहींना पोलिसानी ताब्यात घेऊन अटक केली. अधिक तपास तासगाव पोलिस करीत आहेत.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter