09-Jun-2019 : सांगली / प्रतिनिधी
अलीकडच्या काळात काही शिक्षण संस्था धनवंतांच्या पाल्याना गुणवंत करण्याचा व्यवसाय करीत असताना वुइमेन्स एज्युकेशन सोसायटीने मात्र सर्वसामान्यांच्या पाल्याना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे असे उद्गार खा. संजयकाका पाटील यांनी काढले.
स्त्री शिक्षणाची ८६ वर्षांची परंपरा असलेल्या वुइमेन्स एज्युकेशन सोसायटीच्या राणी सरस्वतीदेवी कन्या शाळेच्या विस्तारित वास्तूचे उद्घाटन आणि विविध विभागांच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खा.पाटील बोलत होते.शिवानी मोघे यांनी शारदास्तवन गायले. स्वागत व प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्षा मेधा भागवत यांनी करताना आम्ही पाहिलेले स्वप्न आज पूर्ण झाले आहे.आमच्या स्वप्नपूर्तीसाठी अनेक देणगीदारांची मदत झाल्याचे सांगितले. मान्यवरांच्या हस्ते देणगीदारांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी आपल्या भाषणात म्हणाले , या संस्थेला मोठा इतिहास आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हे पहिले कन्या महाविद्यालय सांगलीत आणण्यात गाडगीळ कुटुंबाचाही वाटा आहे.सुभाष बेदमुथा यांनी मोठी देणगी देऊन संस्थेची पुढील वाटचाल सुकर केली आहे. या संस्थेच्या अनेक विद्यार्थिनी विविध क्षेत्रात आघाडीवर आहेत असं त्यांनी यावेळी सांगितले.माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा यांनी, आई-वडिलांचे ऋण कधीही फिटत नाहीत.आज समाजात कित्येकजण समाजहित न पाहता स्वहीतच पाहत आहेत असे सांगितले.विजय जैन यांनीही मनोगत व्यक्त केले.खा.संजयकाका पाटील यांनी आपल्या भाषणात, अलीकडच्या काळात आपण समाजऋण विसरत चाललोय , दर्जेदार शिक्षण हीच या संस्थेची खरी ओळख आहे.
|