Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
प्रतिमा निर्मिती ही सातत्यपूर्वक साधण्याची कला : उपाध्ये

19-Jun-2019 : सांगली / प्रतिनिधी

लोकप्रतिनिधीची प्रतिमा निर्मिती ही क्षणिक प्रक्रिया नसून सातत्यपूर्वक प्रयत्नपूर्वक साधण्याची कला आहे. त्यासाठी संवाद कौशल्य हा उत्तम मार्ग असल्याचे मत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी व्यक्त केले. तर महिला नगरसेविकांनी आकर्षक व्यक्तिमत्व व जनतेशी उत्कृष्ट संभाषण निर्माण केले तर त्या यशस्वी लोकप्रतिनिधी होऊ शकतात, असे मत इमेज कन्सल्टंट ऋतुजा कंटक यांनी व्यक्त केले.

अजिंकियन वुमन फौंडेशन व महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने नगरसेविकांसाठी पर्ल हॉटेलमध्ये दोन दिवसांची कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला. कार्यशाळेचे उद्घाटन भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर संगीता खोत, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मोहना ठाणेदार आदी उपस्थित होत्या.

उपाध्ये पुढे म्हणाले, संभाषणकला, भाषण कौशल्य, सामाजिक व राजकीय शिष्टाचार या संदर्भात लोकप्रतिनिधींनी नेहमी जागरूक राहण्याची गरज आहे. राजकारणात वावरत असताना संवादाच्या माध्यमातून प्रशासन आणि नागरिकांशी नाते निर्माण होते. भाषण करण्यापूर्वी किंवा संवाद करण्यापूर्वी संंबंधित विषयाचा चौफेर अभ्यास झाला पाहिजे. विषयाची मांडणी करून त्यामध्ये काय बोलावे यापेक्षा काय बोलू नये, हे समजून घेतले पाहिजे तरच लोकप्रतिनिधी यशस्वी होऊ शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.

दुसर्‍या दिवशीच्या सत्रामध्ये पुण्याच्या इमेज कन्सल्टंट ऋतुजा कंटक यांनी व्यक्तिमत्व विकास, सॉफ्ट स्किल्स’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी नगरसेविकांना धडे दिले. जनतेत आपली प्रतिमा निर्माण करण्यासाठी कोणत्या पक्षाची गरज नसते. निवडून देताना जनता व्यक्ति पाहते. त्यामुळे यशस्वी लोकप्रतिनिधी होण्यासाठी व्यक्तिमत्व विकासावर भर दिला पाहिजे. आपले राहणीमान, वागणूक, पोषाख, जनतेशी असलेले संभाषण, संपर्क या गोष्टी महत्वाच्या आहेत.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter