Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
सांगलीसह पश्‍चिम भागात रिमझिम

19-Jun-2019 : सांगली / प्रतिनिधी

मागील आठवड्यापासून वाढलेला उन्हाचा तडाखा व मान्सूनपूर्व पावसाचे वेध लागले असतानाच, बुधवारी दुपारनंतर सांगली शहरात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील शिराळा, वाळवा तालुक्यासह मिरज पश्‍चिम भागातही पावसाच्या सरी कोसळल्या. चांदोली धरण परिसरात मान्सूनच्या आगमनापूर्वीच पावसाने आठ दिवसात शंभर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

सकाळपासूनच सांगली, मिरज शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये ढगाळ हवामान होते. जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली असली तरी, शहरात एकही पाऊस झाला नसल्याने शहरवासीयांना पावसाची प्रतिक्षा होती. दुपारनंतर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी चारच्या सुमारास पावसास सुरूवात झाली. अगदी कमी वेळ पडलेल्या पावसानंतर रात्री हवेत गारवा निर्माण झाला होता. चांदोली धरण परिसरात मान्सूनच्या आगमनाच्या अगोदरच पावसाने शंभरी पार केली. गेल्या चोवीस तासांत दहा मिलिमीटर पावसासह एकूण १०४ मिलिमीटर पावसाची नोंद वारणावती येथील पर्जन्यमापकावर झाली आहे.

तांदुळवाडी (ता. वाळवा) परिसरात बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. गेल्या चार दिवसांत कडक ऊन पडण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे टोकण करुन उगवून आलेले भुईमूग, सोयाबीनची कोवळी पिके जळून जाण्याची भिती होती , मात्र बुधवारी पडलेल्या पावसामुळे या कोवळ्या पिकांना जीवदान मिळाले आहे. शिराळा तालुक्यातील कोकरुड, शेडगेवाडी, येळापूर, मेणी परिसरात संततधार सुरू असून, बुधवारी दुपारनंतर पावसाचा जोर वाढला आहे.

शिराळा तालुक्याच्या पश्‍चिम भागात ठिकठिकाणी तुरळक पावसाच्या सरी पडत होत्या , मात्र त्याचा फायदा शेतीसाठी होत नव्हता. त्यातच येळापूर, मेणी, शेडगेवाडी आदी परिसरात खरीप हंगामातील भात धूळवाफ पेरणी झाली आहे. या हंगामात पाऊस लांबल्याने मका, भुईमूग यांची पेरणी खोळंबली होती. मात्र मंगळवार सायंकाळपासून हलक्या पावसास सुरुवात झाली असून, बुधवारी दिवसभर ही संततधार सुरूच होती. बुधवारी दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter