Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
३५ वर्षांची मागणी ना.सदाभाऊ खोत यांनी नेली पूर्णत्वास... ताकारी व भवानीनगर भुयारी मार्गासाठी ८ कोटी मंजूर

19-Jun-2019 : इस्लामपूर / प्रतिनिधी

वाळवा तालुक्यातील ताकारी व भवानीनगर रेल्वे लाईनवर रेल सब वे साठी (भुयारी मार्ग) यशस्वी पाठपुरावा करत अर्थसंकल्पामध्ये प्रत्येकी ४ कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा ताकारी व भवानीनगर येथील ग्रामस्थांनी सत्कार केला.

ताकारी येथे रेल्वे लाईनच्या दोन्ही बाजूस लोकवस्ती आहे. तसेच शाळा , नदी व मुख्य बाजारपेठ एका बाजूस आहे. तेथे रेल्वेचा पादचारी पूल असल्याने वाहनाने वाहतूक करता येत नाही. तसेच भवानीनगर येथे देखील रेल्वे लाईनमुळे नागरिकांना ये-जा करण्यास व वाहनांना वाहतूक करण्यास अडचणी येत आहेत. यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी ताकारी व भवानीनगर येथे रेल सब वे उभा करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी ना. सदाभाऊ खोत यांच्याकडे केली होती. या संदर्भात ना.सदाभाऊ खोत यांनी रेल्वे विभागाच्या अधिकार्‍यांच्या पुणे व मुंबई या ठिकाणी बैठका घेतल्या होत्या. दिल्लीवारीही केली होती , परंतु रेल्वे मंत्रालयाने १ लाख प्रवाशी रहदारी नसल्यामुळे या कामासाठी निधी देवू शकत नाही असे स्पष्ट केले होते. यानंतर ताकारी व भवानीनगर ही दोन्ही कामे रेल सब वे (भुयारी मार्ग) कसे करता येतील या दृष्टीकोनातून मंत्रालयामध्ये संबंधित मंत्री व अधिकारी यांच्यासमवेत बैठका घेण्यात आल्या. अगदी अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी प्रयत्न करून या दोन्ही रेल सब वेकरिता (भुयारीमार्ग) तरतूद करण्याबाबत यश आले. हे दोन्ही भुयारी मार्ग होणे हे कसे महत्वाचे आहे हे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील व अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना पटवून देण्यात आले.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter