Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
सांगलीत गुन्हेगाराकडून भाऊजीचा खून

19-Jun-2019 : सांगली /प्रतिनिधी

येथील १०० फुटी रस्त्यावरील पाकिजा मशिदीमागे मेहुण्याकडून भाऊजीचा चाकूने भोसकून खून झाल्याची घटना बुधवारी रात्री दिड वाजण्याच्या सुमारास घडली. कौटुंबिक वादातून हा खून झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. जमीर रफिक पठाण (वय ५५) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी अलीम सलीम पठाण (वय ३०) आणि शाहरुख सलीम पठाण (वय २७) अशी हल्लेखोरांची नावे आहेत. दोघांच्या शोधासाठी कर्नाटक व अन्य ठिकाणी ३ पथके रवाना करण्यात आली आहेत. अलीम हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर मिरज शहारला खुनाचा १ आणि सांगली शहरला जमावबंदीचे २ असे एकूण ३ गुन्हे दाखल आहेत.

याबाबत अधिक माहित अशी की , जमीर हा नात्याने हल्लेखोर अलीम आणि शाहरुख यांचा मेहुणा आहे. दोघे संशयित सख्खे भाऊ आहेत. जमीर याचे पेण-पनवेल येथे हॉटेल आहे. अलीम हा एका गुन्ह्यात कारागृहात असताना त्याचा मुलगा त्याच्या बहिणीकडे राहत होता. तो अलीम यास भेटण्यास जात नव्हता. त्यामुळे त्याच्यात व कुटुंबात सारखी भांडणे, वाद होत होते. बुधवारी रात्री अलीम याचा भाऊजी जमीर याच्यासोबत वाद झाला होता.यावेळी जमीर याने आता विनाकारण वाद नको , उद्या सकाळी बघू असे त्या दोघांना सांगितले. परंतु अलीम ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. रागाच्याभरात त्याने चाकू काढून भाऊजी जमीरच्या पोटात जोरदार वार केला. वार करतेवेळी जमीर याने स्वतःच्या बचावासाठी हातमध्ये घातला असता त्याच्या हातावरही वार झाला आहे. जमीरच्या पोटावर झालेला वार इतका जोरात होता की एकाच वारात जमीर गंभीर जखमी होऊन खाली कोसळला. तो खाली कोसळल्यावर अलीम व शाहरुख यांनी तेथून पलायन केले. गंभीर जखमी झालेल्या जमीर यास काहींनी दुचाकीवरूनच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान काही वेळातच जमीर यांचा मृत्यू झाला. पेण-पनवेल येथे राहत असलेले जमीर याचे कुटुंबीय मेहुणीच्या मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने १५ दिवसांपूर्वी सांगलीत आले होते. सर्वजण पाकिजा मशिदीच्या मागे असणार्‍या अलअमीन शाळेजवळ राहत होते.

पाकिजा मशिदीच्यामागे एकावर चाकूहल्ला झाल्याचे समजताच सांगली शहर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळावरून माहिती घेतली. सांगली शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर आणि सांगली शहरचे पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील दोघेही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपासाबाबत मार्गदर्शन केले. संशयितांच्या शोधासाठी कर्नाटकात २ आणि अन्य एका ठिकाणी १ अशी तीन पथके रवाना करण्यात आली आहेत.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter