Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
रस्ते अतिक्रमणमुक्त करणार : मनपा उत्पन्नवाढीवर भर : नूतन मनपा आयुक्त नितीन कापडणीस

19-Jun-2019 : सांगली / प्रतिनिधी

महापालिका क्षेत्रातील नागरिकांना मुलभूत सुविधा देण्याबरोबर केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून सुरू असलेल्या योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करुन महापालिका क्षेत्रातील रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याला आपण प्राधान्य देऊ तसेच महापालिकेचे उत्पन्नही वाढवू, अशी ग्वाही नूतन आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली , तर माझ्या सेवेची सुरूवात सांगलीतून झाली आणि आता सांगलीत पदोन्नती म्हणून आयुक्त झालो याचा सार्थ अभिमान वाटत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

आयुक्त नितीन कापडणीस यांनी बुधवारी आयुक्तपदाचा पदभार स्विकारला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, सांगलीत प्रशिक्षणार्थी उपायुक्त म्हणून आणि त्यानंतर तीन वर्षे उपायुक्त म्हणून महापालिकेत काम केले. आता याच मनपात आयुक्तपदाची संधी मिळावी असे माझे स्वप्नं होते. हे स्वप्न पूर्ण झाल्याचा सार्थ अभिमान आहे. केंद्र व राज्य शासन शहराला विविध नागरी सुविधा सक्षमीकरणासाठी योजना देतात. महापालिका क्षेत्रात मोठ्या योजना सुरू आहेत. अर्थात त्या वेळेत दर्जेदारपणे राबवून पूर्ण करणे ही पदाधिकारी, नगरसेवकांपेक्षा प्रशासनाची अधिक जबाबदारी असते. त्या वेळेत पूर्ण न झाल्यास शासनाचा त्या महापालिकेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. योजना अपूर्ण राहिल्यास भविष्यात निधी व नव्या योजना मिळण्यात मोठी अडचण निर्माण होते. त्यामुळे विकासाला मोठा खोडा बसतो. त्यामुळे शहरात सुरू असलेल्या पाणी, ड्रेनेज योजनांसह विविध योजना पूर्णत्वाला नेणे हे पहिले उद्दिष्ट असेल असे आयुक्त कापडणीस यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, नागरिकांना मुलभूत सुविधा देण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक ती यंत्रणा तयार करण्यात येणार आहे. तीनही शहरात अतिक्रमणाचे प्रश्‍न आहेत हे मला माहीत आहे. त्या दृष्टीने पूर्वी काय नियोजन केले आहे, आता त्यात काय सुधारणा करण्याची गरज आहे याची महिती घेऊ. त्यानुसार शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठा अतिक्रमणमुक्त होतील यासाठी मास्टर प्लॅन आखून त्याची अंमलबजावणी करू. फेरीवाला धोरण अद्याप रखडले आहे ते राबवून नो हॉकर झोन, हॉकर झोन निश्‍चित करू. त्या द्वारे अतिक्रमणाने होणारा कोंडमारा संपवू, अशी ग्वाही दिली. बांधकाम नियमावली आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी आता यापुढे कोणतीही अनधिकृत बांधकामे, अतिक्रमित बांधकामे होऊ नयेत याची विशेष खबरदारी घेतली जाईल. प्रत्येक बांधकामांना पुरेशी पार्किंग सक्ती करून नव्याने वाहतूक कोंडी रोखू, अशी ग्वाही त्यांनी दिली. ते पुढे म्हणाले, नागरी सुविधा आणि विकासकामांसाठी महापालिकेची तिजोरी सक्षम असणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने उत्पन्नाचे स्त्रोत बळकट करणे, वाढविण्याचे लक्ष ठेवून काम करू. त्यासाठी लवकरच अधिकार्‍यांची बैठक घेऊन नियोजन करू.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter