Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
अधिवेशनानंतरच विधानसभेचे रण तापणार

25-Jun-2019 : सांगली / प्रतिनिधी

राज्याचे पावसाळी विधीमंडळ अधिवेशन येत्या २ जुलै रोजी संपत आहे. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक ही साधारणत: १५ ते २० ऑक्टोबर दरम्यान होते, तर विधानसभेची आचारसंहिता ही १५ सप्टेंबरपासून लागू होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचे रण हे विधीमंडळ अधिवेशन संपल्यानंतरच तापण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार त्यामध्ये सांगली जिल्ह्याला ना.सुरेश खाडे यांच्या रुपाने मिळालेले स्थान, हातात असलेली सत्तास्थाने यामुळे भाजप जोशात असेल तर शिवसेनेला एक जागा वगळता इतर जागा पदरात पाडून घेण्यासाठी झगडावे लागेल. कॉंग्रेस-राष्ट्रवादीला आळस झटकून कामाला लागावे लागेल, तरच त्यांचे अस्तित्व सांगली जिल्ह्यात टिकेल अन्यथा जिल्हा भगवा होण्यास वेळ लागणार नाही.

अंतरीम अर्थसंकल्प व पावसाळी अधिवेशन सध्या मुंबईत सुरु आहे. शेवटचेच अधिवेशन सुरु असल्यामुळे अनेकजण जनतेसाठी आपण खूप काही करत आहोत, हे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मंत्रिमंडळातील नवीन सहकारी तसेच नवीन विरोधी पक्षनेते, उपसभापती या सर्वांना थोडकी संधी मिळत असल्यामुळे सर्वांचेच ट्वेंटी-२० सुरु आहे. २ जुलै रोजी हे अधिवेशन संपत आहे. त्यानंतरच सर्व आमदार आपापल्या जिल्ह्यात परततील व विधानसभा निवडणुकीच्या तयारीस लागतील. ऑक्टोबर महिन्यात मतदान व सप्टेंबर महिन्यात आचारसंहिता असा निवडणूक आयोगाचा कार्यक्रम असतो. त्यामुळे इच्छूक किंवा आजी आमदारांच्या हातात आता जुलै व ऑगस्ट हे दोनच महिने पूर्ण तयारीसाठी राहिले आहेत.

सांगली जिल्ह्यात भाजपचे चार, राष्ट्रवादीचे दोन, कॉंग्रेस व शिवसेनेचा प्रत्येकी एक आमदार आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये खानापूर-आटपाडी-मिरज या जागांवर अदलाबदलीची मागणी आहे. शिराळ्याची मागणी असली तरी प्रत्यक्षात किती अंमलात येते हा प्रश्‍न आहे. दुसर्‍या बाजुला शिवसेना चार जागा मागत असली तरी विद्यमान आमदारांची खानापूर-आटपाडी ही जागा वगळता इतर जागा मिळविण्यासाठी त्यांना झगडावे लागेल.

सांगली विधानसभा मतदारसंघात आ.सुधीर गाडगीळ व मिरजेतून ना. सुरेश खाडे हे विकासकामांतून मतदारांसमोर जातील. कॉंग्रेसकडून श्रीमती जयश्रीताई पाटील की पृथ्वीराज पाटील हा पेच सांगलीसाठी असेल, तर मिरजेला सक्षम उमेदवार शोधणे हे कॉंग्रेससमोर आव्हान असेल. तासगाव-कवठेमहांकाळमध्ये आ.सुमनताई पाटील व अजितराव घोरपडे यांच्यात तर पलुस-कडेगावमध्ये आ.विश्‍वजीत कदम व जि.प. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यात पारंपरिक लढत होईल. तासगावमध्ये खासदार संजयकाका पाटील हे अजितराव घोरपडेंचा पैरा फेडणार असल्यामुळे निवडणुकीत रंग भरणार आहे. पलूसमध्ये अरुणअण्णा लाड गटाची भूमिका महत्वाची ठरेल. खानापूर - आटपाडी मतदारसंघात आ.अनिल बाबर यांना माजी आ.सदाशिव पाटील यांचे आव्हान असेल तर गोपीचंद पडळकर यांची वंचित आघाडी काय निर्णय घेते यावरही गणिते अवलंबून असतील. शिराळ्यात आ.शिवाजीराव नाईक यांना माजी आ.मानसिंगराव नाईक यांचे तगडे आव्हान असेल , तसेच सम्राट महाडिक यांची उमेदवारीही पारडे ठरविणारी असेल. इस्लामपूरमध्ये आ.जयंत पाटील यांचे पारडे जड दिसत असले तरी बारामतीप्रमाणे इस्लामपूर लक्ष्य करण्याचे भाजपने ठरविले तर मात्र ना.सदाभाऊ खोत किंवा निशिकांत पाटील हे जोरदार लढत देतील. जतमध्ये आ.विलासराव जगताप यांना पक्षांतर्गत डॉ.रविंद्र आरळी, तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुड्डोडगी, जि.प.सभापती तम्मनगौडा रवि-पाटील यांचा विरोध सहन करावा लागेल. वंचित आघाडीकडून प्रकाश शेंडगेंची उमेदवारी येथून राहील. कॉंग्रेसकडून विक्रमसिंह सावंत हे यावेळी विजयासाठी नेटाने प्रयत्न करतील.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter