Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
जिल्ह्यात सरासरी १०७ टक्के पाऊस

25-Jun-2019 : सांगली / प्रतिनिधी

राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत असताना सांगली जिल्ह्यात जूनमध्ये सरासरी १०७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील पावसाच्या सरासरीपेक्षा सर्वाधिक पाऊस सांगली जिल्ह्यात झाला. जिल्ह्यात पावसाची नोंद वाढली असली तरी पेरण्यांना गती आलेली नाही, बळीराजा दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहे. तासगाव, कवठेमहांकाळ, जत, कडेगाव तालुक्यात मंगळवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. सांगली शहरातही पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात मात्र पावसाचा जोर ओरसला.

राज्यातील निम्म्याहून अधिक जिल्ह्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न गंभीर बनला असून प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. यंदा अवकाळी पावसाने हुलकावणी दिल्याने दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या. मान्सूनचे आगमन झाले असले तरी अद्याप पावसाने जोर धरलेला नाही. सध्या सोसाट्याचे वारे वाहत आहेत. ऊन-सावल्यांचा खेळ चालू आहे. जून महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा सर्वाधिक पावसाची नोंद सांगली जिल्ह्यात झाली. येथे पंचवीस दिवसांत ७१ मिलीमीटर पाऊस पडतो. मात्र आतापर्यंत ७५.३ टक्के म्हणजे सरासरीच्या १०७ टक्के पाऊस झाला आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार दुष्काळी आटपाडी तालुक्यात सरासरीच्या १५४ टक्के पाऊस झाला. तासगाव तालुक्यात सरासरीच्या १४४ टक्के, कवठेमहांकाळ तालुक्यात सरासरीच्या १३९ टक्के तर जत तालुक्यात सरासरीच्या १३४ टक्के पाऊस झाला आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter