Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
नगरसेवक योगेंद्र थोरात यांना नगरसेविकेच्या पतीकडून मारहाण

25-Jun-2019 : नगरसेवक योगेंद्र थोरात यांना नगरसेविकेच्या पतीकडून मारहाण

सांगली / प्रतिनिधी

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या मुख्यालयात राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांना नगरसेविका पती अभिजित हारगे यांनी मारहाण करीत धक्काबुक्की केल्याची घटना मंगळवारी घडली. ही घटना दुपारी साडेबाराच्या दरम्यान महापालिकेच्या मुख्यालयात अधिकार्‍यांसमक्ष घडली. नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी आपल्या प्रभागासाठी स्वतंत्र विकास काम मंजूर करुन घेतले होते. यामुळे चिडून अभिजित हारगे यांनी शिवीगाळ करीत थोरात यांना मारहाण केली. या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात दोघांनी एकमेकांविरोधात धाव घेतली. दोन्ही गटांच्या समर्थकांची मोठी गर्दी झाली होती.

नगरसेवक योगेंद्र थोरात, नगरसेविका संगीता हारगे, व स्वाती पारधी हे मिरजेच्या प्रभाग २० मधून राष्ट्रवादीतून निवडून आलेले आहेत. सौ. हारगे या प्रभागातून दुसर्‍यांदा निवडून आलेल्या आहेत. सौ. हारगे यांनी मागील टर्ममध्ये स्थायी समिती सभापती म्हणूनही काम केले होते. त्यामुळे सौ. हारगे आणि पतीराज अभिजित हारगे यांचा प्रभागात वरचष्मा आहे. प्रभागातील कामे त्यांना विचारूनच केली जावीत असा हारगे दांपत्याचा दबाव असल्याचा थोरात यांचा आरोप आहे.

दरम्यान, थोरात यांनी प्रभागातील काही कामे प्रस्तावित केली आहेत. दुसरीकडे अन्य ठिकाणचे काम रद्द करून त्यांच्या सूचनेनुसार काम करावे अशी हारगे यांनी मागणी केली होती. थोरात हे नेहमीप्रमाणे महापालिकेत कामानिमित्त आले होते.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter