Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
सावळीचा ग्रामसेवक निलंबित

29-Jun-2019 : मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची कारवाई

सांगली / प्रतिनिधी

सावळी (ता. मिरज) येथील ग्रामसेवकासह लिपिकाला बांधकाम परवान्यासाठी अडीच हजाराची लाच घेतल्याप्रकरणी बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. याप्रकरणी ग्रामसेवक सतीश खाडे यांच्यावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी निलंबनाची कारवाई केली. तसेच ग्रामपंचायतीतील लिपिक अशोक नाईक यांना कामावरुन कमी करण्याच्या सूचना मिरज गटविकास अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

तक्रारदार यांनी सावळी ग्रामपंचायतीत बांधकाम परवान्यासाठी अर्ज केला होता. बांधकाम परवाना देण्यासाठी ग्रामसेवक खाडे याने तक्रारदारांकडे तीन हजार रुपयांची मागणी केली होती. लिपिक नाईक यानेही पैशाची मागणी केली. अखेर अडीच हजार रुपयांवर त्यांच्यात तडजोड झाली. त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची पडताळणी केली, त्यावेळी ग्रामसेवक खाडे, लिपिक नाईक या दोघांची नावे निष्पन्न झाली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सावळी ग्रामपंचायत परिसरात सापळा लावला व ग्रामसेवक खाडे याला लाच घेताना रंगेहात पकडले.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter