Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
एकतर्फी प्रेमातून तरुणाची सांगलीत नदीत उडी घेऊन आत्महत्या

29-Jun-2019 : सांगली / प्रतिनिधी

एकतर्फी प्रेमातून तरुणाने शनिवारी सकाळी कृष्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. संगणकाच्या क्लासच्या निमित्ताने सहा महिन्यांपूर्वी ओळख झालेल्या तरुणीवर अबरार झाकीर मुलाणी (वय २४, रा. संजयनगर) याचे एकतर्फी प्रेम होते. शनिवारी नदीकाठी दोघे बोलत असताना तरुणी केवळ मैत्रीवरच ठाम राहिल्याने अबरारने गाडीच्या किल्ल्या आणि मोबाईल तिच्या हातात ठेवून नदीत उडी घेतली. साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधून काढला.

सांगलीतील संजयनगरमधील आक्सा मशिदीजवळच्या पठाण मंझीलमध्ये राहणारा अबरार आणि संबधित तरुणीची सहा महिन्यांपूर्वीच ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाल्याने त्यांच्यात अधून मधून चर्चा होत असत. शनिवारी सकाळी सव्वा सहा वाजता अबरारने वसतिगृहात राहणार्‍या संबधित तरुणीला फोन केला. बोलण्याचे निमित्त करुन तिला मोटरसायकलवरुन कृष्णा नदी काठावर असलेल्या स्वामी समर्थ मंदीरानजीक नेले. दोघे काहीवेळ बोलत बसले. तरुणीने आपण केवळ मित्रच आहोत. त्या पुढचे आपल्याला काहीही शक्य नाही, असे सांगून टाकले. त्यानंतर तरुणाने गाडीची किल्ली आणि आपला मोबाईल तिच्याजवळ दिला. आलोच, असे सांगून तो नदीकडे धावला. त्याने नदीत उडी घेतली. तो पोहायला गेला असेल , असे समजून तरुणीही नदीकाठी गेली. त्यावेळी तो बुडत असल्याचे पाहून तरुणीने आरडाओरडा केला. त्या परिसरात पोहणार्‍यांनी आपल्याकडील रबरी इनर अबरार याच्या दिशेने फेकली , परंतु तो पर्यंत तो बुडाला होता. काही वेळातच अग्निशमन दल आले. त्यांनी नदीत अबरारचा शोध घेतला. साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह सापडला. या प्रकरणी संबधित तरुणीने सांगली शहर पोलिसांना घडलेला संपूर्ण प्रकार कथन केला आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter