Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
जिल्ह्यात संततधार, चांदोलीत अतिवृष्टी

29-Jun-2019 : सांगली / प्रतिनिधी

जिल्ह्यात शनिवारीही पावसाचा जोर कायम राहिला. वाळवा, पलूस, कडेगाव, मिरज, तासगाव तसेच कवठेमहांकाळ तालुक्यात दिवसभर संततधार सुरु होती. चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली असून बत्तीस तासात तब्बल १२१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शिराळा तालुक्यातही ४० मिलीमीटर पाऊस झाला. दमदार पाऊस सुरु झाल्याने शेतकरी सुखावला आहे. जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या होत्या, पावसामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सांगली शहरातही दिवसभर पावसाची संततधार सुरू राहिली.

चांदोली परिसरात गुरूवार दुपारपासुनच सुरू असलेल्या मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या संततधारेचे रुपांतर शनिवारी मुसळधार स्वरूपात सुरु असून गेल्या २४ तासांमध्ये वारणावती येथील पर्जनमापन केंद्रावर ७० मी . मी पावसाची नोंद झाली आहे

सतत पडणार्‍या मुसळधार पावसामुळे शिराळा तालुक्यातील व पाश्चिम भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आरळा बाजारावर याचा परिणाम झाला आहे. भात शेती मध्ये पाणी साठून राहिले आहे, या परिसरात वारंवार वीज गायब होत आहे, सध्याचा पाऊस जिरवणीसाठी उपयुक्त ठरत आहे डोंगर हिरवेगार बनले असून हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये सुर्याचे दर्शन झालेले नाही, डोंगर माथा तसेच गुढे पाचगणीचा पठार धुक्यानी व्यापून गेला आहे मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सध्या चांदोली धरणामध्ये उपयुक्त साठा १ .१५ टीएमसी शिल्लक आहे . या वर्षी आजअखेर २३९ मी. मी. पावसाची नोंद झाली आहे सध्या या भागात पावसाचा जोर कायम आहे.

शनिवारी पावसाने जोर वाढविल्याने शनिवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत ५१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. धरणातील पाण्याचा साठ्यातही वाढ होत आहे. सायंकाळी सहा वाजता चांदोली धरणात ८.१५ टीएमसी पाणीसाठा होता. कोयना धरण परिसरात चोवीस तासात १३८ मिलीमीटर पाऊस झाला , धरणात १२.२६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. महाबळेश्‍वरला १५७ तर नवजामध्ये चोवीस तासात १७३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत शनिवारी सायंकाळी ३ फुटाने वाढ झाली.

वाळवा तालुक्यातील इस्लामपूर, ताकारी, वाळवा, बावची, पेठ, बागणी, ढवळी, कोरेगाव, बहादूरवाडी, तांदूळवाडी, कुंडलवाडी येथे जोरदार पावसामुळे शेतात पाणी साचल्याचे चित्र होते. शिराळ्यातील सर्वच गावात मुसळधार पाऊस झाला . जोराच्या पावसामुळे ओढे, नाले पाण्याने ओसंडून वाहत होते. पलूस, कडेगाव तसेच मिरज पश्‍चिम भागाला दिवसभर पावसाने झोडपून काढले. खानापूर, कवठेमहांकाळ या परिसरातही पावसाने हजेरी लावल्याने समाधान व्यक्त होत आहे . जत तालुक्यात तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या. जिल्ह्यातील बहुतांशी गावांत संततधार सुरू आहे.

जून महिना संपत आला तरीही पावसाने हजेरी न लावल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. शेतातील मशागतीची कामे आटोपून तो पेरणी करण्यासाठी ढगाकडे डोळे लावून बसला होता. जून महिना संपत आला, तरी पाऊस न पडल्याने विहिरींनीही तळ गाठला होता. पाऊस नसल्यामुळे उस पीक धोक्यात आले होते , मात्र, शुक्रवारी रात्रीपासून संततधार पाऊस पडू लागल्याने शेतकरी सुखावला आहे. ऊस लागण करण्यासाठी त्याची लगबग सुरू झाली आहे. उशिरा का होईना पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्‍यांतून समाधान व्यक्त होत आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter