Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
जिल्ह्यातील पाच जागा ‘स्वाभिमानी’लढविणार

05-Jul-2019 : सांगली / प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी पक्षाने राज्यात ४९ जागा लढविण्याचा निर्णय पुण्यातील राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला आहे. जिल्ह्यातील तासगाव-कवठेमहांकाळ, खानापूर-आटपाडी, जत, मिरज व पलूस-कडेगावसह पाच जागा लढविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुणे येथे माजी खा. राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीला स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रकाश पोफळे, हंसराज वडघुले, पूजा मोरे, अमोल हिपरगे, प्रा. जालिंदर पाटील आदी उपस्थित होते.

बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. निवडणुकीत आलेल्या अपयशाचे चिंतन करण्यात आले, तसेच आगामी विधानसभा निवडणूक ताकदीने लढण्याचा निर्धार करण्यात आला. विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवायची की महाआघाडीतून लढवायची याचा निर्णय ऑगष्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार्‍या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात येणार आहे. राज्यातील ४९ विधानसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय झाला. कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणुकीत यश संपादन करायचे. त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी सर्व शक्तीनिशी झोकून द्यायचे, गाफील न राहता काम करण्याचे एकमताने ठरविण्यात आले.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter