Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
जिल्ह्यातील सहा मतदारसंघांसाठी कॉंग्रेसकडून १७ इच्छुकांचे अर्ज

05-Jul-2019 : खानापूर-आटपाडी व इस्लामपुरमधून एकही अर्ज नाही

सांगली / प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाकडून जिल्ह्यातील आठ मतदारसंघांतून इच्छूक असणार्‍यांचे अर्ज पक्षाने मागविले होते. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत सहा विधानसभा मतदारसंघांतून १७ इच्छुकांनी अर्ज दाखल केले. त्यामध्ये आ.विश्‍वजीत कदम, जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील, विक्रम सावंत, आनंद डावरे, सिध्दार्थ जाधव, सदाशिव खाडे आदींचा समावेश आहे , मात्र खानापूर-आटपाडी व इस्लामपूर या दोन्ही मतदारसंघांतून एकाही इच्छुकाने अर्ज दाखल केला नाही.

विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर प्रदेश कॉंग्रेसने जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय इच्छूक उमेदवारांचे अर्ज मागविण्यास सुरूवात केली आहे. जिल्हा पातळीवर अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख शुक्रवार दि. ५ जुलैपर्यंतची होती. या काळात सहा मतदारसंघांतून १७ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये मिरज मतदारसंघातून सर्वाधिक नऊ जण इच्छूक आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे समाजकल्याण समितीचे माजी सभापती सदाशिव खाडे, सिध्दार्थ जाधव, आनंद डावरे, डॉ.नामदेव कस्तुरे, माजी विरोधी पक्ष नेते सदाशिव वाघमारे, नंदादेवी कोलप, अरूण धोत्रे, हेमराज सातपुते, धवलराज सातपुते यांचा समावेश आहे.

सांगली विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, अखिल भारतीय कॉंग्रेसच्या सदस्या जयश्रीताई पाटील, बाजार समितीचे माजी सभापती सुभाष खोत व संतोष पाटील या इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter