25-Jul-2019 : सांगली / प्रतिनिधी
कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही स्थानिक पक्षांच्या आमदारांना वेगवेगळ्या पद्धतीने आमिष दाखवून सत्ताधारी पक्षप्रवेश सध्या घेत आहे . जो सरकारच्या विरोधात बोलेल, आवाज उठवेल, त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या निमंत्रणाला टाळेल, त्यांच्या आग्रहाला बळी पडणार नाही , अशांच्या मागे सरकार आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून छापे टाकून त्यांचे खच्चीकरण करण्याचा उद्योग करत असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आष्टा येथे केली, विधानसभा निवडणूक जवळ आली असल्याने सरकारकडून सर्व मार्गांचा अवलंब केला जात आहे. संकटाच्या काळात जो सोबत राहतो, त्याचाच कस लागतो, सचिन आहिर यांच्या जाण्याने पक्षाला कोणताच फरक पडणार नसल्याची प्रतिक्रियाही आ. जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांचे घर, कारखाना आणि पुण्यात राहणार्या त्यांच्या मुलाच्या घरावर गुरूवारी पहाटे आयकर विभागाने छापा टाकला. अचानक पडलेल्या या छाप्यामुळे कोल्हापूरसह राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ उडाली. या छाप्याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ असणार्या कार्यकर्त्यांना सध्या सत्ताधारी पक्षाकडून वेगवेगळी आमिषे दाखविली जात आहेत. आयकर विभागाने मुश्रीफ यांच्या घरावर आणि कारखान्यांवर छापे टाकले आहेत मात्र, मुश्रीफ हे अत्यंत साधे भोळे, सरळ आणि थेट जनतेमध्ये मिसळणारे नेते आहेत. आयकर विभागाला छापा टाकून कोल्हापूर जिल्ह्यातील आणि सांगली जिल्ह्यातील सर्व सामान्य जनतेच्या आरोग्याच्या फाईली, त्यांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी केलेली शिफारशी पत्रे, आरोग्य खात्यातील लाखोंच्या खर्चाच्या फायलींचा खच मिळाला असेल आणि तेच त्यांचे खरे धन आहे. कसलीही चौकशी केली तरी याहून वेगळे कोणते धन त्यांच्याकडे सापडणार नाही.
|